Join us  

'या' सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता मिळणार दोन वर्षांची पगारी सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 12:38 PM

ही सुट्टी दोन मुलांच्या संगोपनासाठी जास्तीत जास्त २ वर्षांसाठी सरकारकडून दिली जाईल.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ऑल इंडिया सर्व्हिस म्हणजेच अखिल भारतीय सेवेच्या (AIS) पात्र सदस्यांसाठीच्या सुट्यांबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. याअंतर्गत आता हे कर्मचारी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत दोन वर्षांची पगारी सुट्टी घेऊ शकतात. ही सुट्टी दोन मुलांच्या संगोपनासाठी जास्तीत जास्त २ वर्षांसाठी सरकारकडून दिली जाईल.

डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंगने (DoPT) अलीकडेच एक नवीन अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना २८ जुलै रोजी जारी करण्यात आली. याअंतर्गत केंद्र सरकारने राज्य सरकारांशी सल्लामसलत करून ऑल इंडिया सर्व्हिस चिल्ड्रन लीव्ह रूल १९९५ मध्ये सुधारणा केली आहे. दरम्यान, ऑल इंडिया सर्व्हिस कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाते.

२ मुलांच्या संगोपनासाठी ७३० दिवसांची सुट्टीऑल इंडिया सर्व्हिसच्या (AIS) एक महिला किंवा पुरुष सदस्याला दोन मुलांची काळजी घेण्यासाठी संपूर्ण सेवेदरम्यान ७३० दिवसांची सुट्टी दिली जाईल. पालकत्व, शिक्षण, आजारी आणि तत्सम काळजी या कारणास्तव मुलाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी ही सुट्टी दिली जाऊ शकते.

सुट्टीदरम्यान किती टक्के मिळणार पगार?चाइल्ड केअर लीव्ह अंतर्गत, कर्मचाऱ्याला संपूर्ण सेवेदरम्यान सुट्टीच्या पहिल्या ३६५ दिवसांसाठी १०० टक्के पगार दिला जाईल. तर दुसऱ्या ३६५ दिवसांच्या सुट्टीवर ८० टक्के पगार मिळणार आहे. अधिसूचनेनुसार, चिल्ड्रेन लीव्ह खाते इतर सुट्ट्यांमध्ये एकत्रीत केले जाणार नाही. या अंतर्गत, एक स्वतंत्र खाते असेल, जे कर्मचाऱ्याला स्वतंत्रपणे दिले जाईल.

टॅग्स :कर्मचारीनोकरी