Join us  

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'फेस्टिव्हल गिफ्ट', DA मध्ये ४ टक्क्यांची वाढ; मोदी सरकारची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 2:35 PM

देशात फेस्टिव्हल सीझनला सुरुवात झाली आहे. यातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे.

नवी दिल्ली-

देशात फेस्टिव्हल सीझनला सुरुवात झाली आहे. यातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आता भरघोस वाढ होणार आहे. 

केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महगाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेट कमेटी ऑफ इकोनॉमिक अफेयर्सची (CCEA) बैठक आज पार पडली. याच बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. 

३४ वरुन ३८ टक्के झाला महागाई भत्तासरकारनं याआधी मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ केली होती. १ जानेवारी २०२२ पासून याची अंमलबजावणी करण्यात आली होती. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ टक्क्यांरुन ३४ टक्के इतका झाला होता. आता यात पुन्हा एकदा ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या डीएची टक्केवारी ३८ टक्के इतकी झाली आहे. याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारावर होणार आहे. 

केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात बऱ्याच कालावधीनंतर जुलै २०२१ मध्ये वाढ करत १७ टक्क्यांहून थेट २८ टक्के डीए केला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये पुन्हा एकदा ३ टक्क्यांची वाढ केली होती. त्यामुळे डीए ३१ टक्क्यांवर पोहोचला होता. 

पगारात किती वाढ होणार?सरकारनं सध्याचा महागाईचा दर पाहाता डीएमध्ये ४ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा थेट ५० लाख कर्मचाऱ्यांना आणि ६५ लाख निवृत्ती वेतन धारकांना होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए त्यांच्या वित्तीय सहायता सॅलरी स्ट्रक्चरचाच भाग असतो. आकडेवारीनुसार पाहायचं झालं तर सरकारनं कर्मचाऱ्यांचा डीए आता ३४ टक्क्यांवरुन ३८ टक्के इतका केला आहे. यानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार १८ हजार रुपये असेल तर ३४ टक्क्यांच्या हिशोबानुसार महागाई भत्ता ६,१२० रुपये इतका होतो. तर ४ टक्क्यांच्या वाढीसह संबंधित कर्मचाऱ्याला मिळणारा डीए आता ६,८४० रुपये इतका होणार आहे. 

टॅग्स :नरेंद्र मोदीकेंद्र सरकार