Join us  

८ तासांची ड्युटी, फ्री मेडिकल सुविधा, पीएफ स्कीम; कर्मचाऱ्यांना सर्व हक्क देणारे पहिले उद्योजक होते JRD TATA

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 1:25 PM

जेआरडी टाटा हे देशातील सर्वात मोठं औद्योगिक घराणं असलेल्या टाटा समूहाचे सुमारे ५३ वर्षे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांसाठी अनेक उत्तमोत्तम गोष्टी केल्या.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा म्हणजेच जेआरडी टाटा यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म २९ जुलै १९०४ रोजी झाला. जेआरडी टाटा हे देशातील सर्वात मोठं औद्योगिक घराणं असलेल्या टाटा समूहाचे सुमारे ५३ वर्षे अध्यक्ष होते. जेआरडी यांनी वयाच्या ३४ व्या वर्षी १९३८ मध्ये टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली आणि १९९१ पर्यंत ते या पदावर राहिले. 

ते टाटा समूहाचे सर्वात यशस्वी अध्यक्ष मानले जातात. याच काळात त्यांनी टाटा समूहातील कर्मचाऱ्यांसाठी अनेक क्रांतिकारी योजना सुरू केल्या, ज्या नंतर इतर कंपन्यांनीही स्वीकारल्या. देशात आतापर्यंत केवळ एका उद्योगपतीला भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे आणि ते म्हणजे जेआरडी टाटा. १९९२ मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या आयुष्यातील काही अस्पर्शित पैलूंवर एक नजर टाकू.

रतन दादाभॉय टाटा आणि सुझान ब्रिअर यांचे ते दुसरे अपत्य होते. त्यांची आई भारतात कार चालवणारी पहिली महिला होती. त्या फ्रेंच होत्या, त्यामुळे जेआरडी टाटा यांचं बालपण फ्रान्समध्ये गेलं. तिथूनच त्यांना विमानाची आवड निर्माण झाली. वयाच्या १५ व्या वर्षी जेआरडीयांनी पायलट होण्याचा निर्णय घेतला. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना नऊ वर्षे वाट पाहावी लागली. मुंबईत पहिला फ्लाइंग क्लब सुरू झाला तेव्हा ते २४ वर्षांचे होते. १९२९ मध्ये त्यांना पायलटचा परवाना मिळाला. भारतात पहिल्यांदाच एखाद्याला पायलटचा परवाना देण्यात आला. 

टाटा एअरलाईन्सची सुरुवात

१९३० मध्ये आगा खान पुरस्कारासाठी त्यांनी भारतातून इंग्लंडला उड्डाण केलं. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी टाटा एअरलाइन्स या भारतातील पहिल्या विमान कंपनीची स्थापना केली. पुढे ती सरकारनं ती ताब्यात घेतली आणि त्याचं नाव एअर इंडिया झालं. १९३२ मध्ये जेआरडी टाटा यांना भारतातील पहिल्या कमर्शिअल फ्लाईटच्या उड्डाणाचा मान मिळाला. हे विमान कराचीहून उड्डाण करून मुंबईत उतरलं. अशा प्रकारे भारताची पहिली विमानसेवा सुरू झाली. आता एअर इंडिया टाटा समूहात परतली आहे.

ब्रँड कस्टोडियन हरीश भट्ट यांनी काही वर्षांपूर्वी जेआरडी टाटा यांच्या आयुष्याशी संबंधित एक घटना सांगितली. त्यानुसार एकदा जेआरडी टाटा एअर इंडियातून प्रवास करत होते. त्यांच्या शेजारी आरबीआयचे माजी गव्हर्नर एल. के. झा बसले होते. अचानक जेआरडी टाटा आपली जागा सोडून गेले आणि तासाभरानं परतले. जेव्हा एल. के. झा यांनी त्यांना कुठे गेलेलात असा प्रश्न विचारला, यावर जेआरडी टाटा यांनी टॉयलेट स्वच्छ आहे की नाही हे पाहण्यासाठी गेलो होतो, असं उत्तर दिले. यावर इतका उशीर का झाला असा प्रश्न झा यांनी प्रश्न विचारला. तेव्हा टॉयलेट पेपर नीट बसवला नाही, तो नीट करत होतो, असं उत्तर त्यांनी दिलं.

५० पटींनी वाढ

या भेटीनंतर जेआरडी टाटा यांनी इंडियन एअरलाइन्सच्या प्रत्येक बोईंग विमानाच्या टॉयलेटमध्ये जाऊन सर्वांची स्वत: तपासणी केली. जिथे चूक लक्षात आली, तिथे ती त्यांनी स्वत: दुरुस्त केली. एल. के. झा यांनी एकदा आपल्या भाषणात जेआरडी टाटा हे एअर इंडियाचे चेअरमन नसले तरी प्रवाशांची सोय सुधारण्याबाबत त्यांना नेहमीच काळजी वाटत असे, असं म्हणाले. प्रत्येक उड्डाणानंतर ते एक नोट आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सोडून जात असत. प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी देखभाल आणि एअरलाइन्स कर्मचाऱ्यांसाठी काही टिप्पण्या त्यात होत्या. जेआरडी यांच्या कार्यकाळात टाटा समूहाची ५० पटीनं वाढ झाली. जेआरडी यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचे एकूण बाजारमूल्य १० कोटी डॉलर्सवरून ५०० कोटी डॉलरपर्यंत वाढलं.

आपल्या कार्यकाळात त्यांनी १४ नव्या कंपन्या सुरू केल्या. टीसीएस, टाटा मोटर्स, टाटा सॉल्ट, टाटा ग्लोबल बेव्हरेजेस आणि टायटन सारख्या यशस्वी कंपन्या जेआरडी यांनी सुरू केल्या. जेआरडी यांनी १९५६ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) धर्तीवर टाटा प्रशासकीय सेवा (TAS) सुरू केली, ज्याचा उद्देश टाटा समूहातील तरुण प्रतिभाशाली व्यक्तींना प्रशिक्षित करणं आणि त्यांना नेतृत्वासाठी तयार करणं हा होता. 

टाटांनी उद्योजकतेसह आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी अनेक कामं केली. टाटा यांनी सर्वप्रथम ८ तासांची ड्युटी निश्चित केली होती. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा आणि भविष्य निर्वाह निधी योजना सुरू केली. एखाद्या कर्मचाऱ्याचा अपघात झाल्यास नुकसान भरपाई देण्यासाठी टाटांनी सर्वप्रथम पुढाकार घेतला.

टॅग्स :व्यवसायटाटाएअर इंडिया