नवी दिल्ली : पेट्राेल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे माेडले आहे. मात्र, दुसरीकडे केंद्र सरकारने भरघाेस कमाई केली आहे. गेल्या ३ वर्षांमध्ये केंद्र सरकारने पेट्राेल आणि डिझेलवरीलकरांच्या माध्यमातून ८.०२ लाख काेटी रुपये कमावले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये एका लेखी प्रश्नाच्या उत्तरातून याबाबत माहिती दिली.
गेल्या तीन वर्षांमध्ये पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात झालेली वाढ आणि त्यापाेटी प्राप्त झालेल्या महसुलाची माहिती राज्यसभेत एका लेखी प्रश्नाद्वारे विचारण्यात आली हाेती. त्यास उत्तर देताना सीतारामन यांनी सांगितले, ५ ऑक्टाेबर २०१८ ला पेट्राेलवरील उत्पादन शुल्क १९.४८ रुपये हाेते. ते सध्या २७.९० रुपये प्रतिलीटर आहे. डिझेलवरील उत्पादन शुल्क १५.३३ रुपये हाेते. ते सध्या २१.८० रुपये प्रतिलीटर आहे.
- गेल्या वर्षी काेराेना महामारीच्या काळात पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे ३२.९८ आणि ३१.८३ रुपये करण्यात आले हाेते.
- केंद्र सरकारने २०१८-१९ या वर्षात २ लाख १० हजार २८२ काेटी रुपये, २०१९-२० मध्ये २ लाख १९ हजार ७५० काेटी आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३ लाख ७१ हजार ९०८ काेटी रुपये एवढा महसूल गाेळा केला आहे.