जगभरातील श्रीमंत लोकांची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही श्रीमंत उद्योगपतींच्या संपत्तीत मोठी वाढ होत असून श्रीमंतांची यादीतही भर पडत आहे. जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत दोन ते तीन भारतीय असून गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यानंतर, रिलायन्सचे मुकेश अंबानी हेही श्रीमंतांच्या यादीत येतात. मात्र, श्रीमंत होताच भारतीय लोक स्थलांतर करत असल्याचं दिसून येत आहे. कारण, गतवर्षात भारतातून विदेशात गेलेल्या श्रीमंतांच्या यादीत वाढ झाली आहे. कोविड लॉकडाऊन उठल्यानंतरचं हे वर्ष आहे.
हेनले अँड पार्टनर्सच्या एका अहवालानुसार एकाच वर्षात भारतातील तब्बल ८ हजार करोडपतींनी देश सोडला आहे. या आकडेवारीसह देशातून श्रीमंत निघून जाणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकीकडे जगातील श्रीमंतांच्या यादीत भारतीयांचे नाव अग्रस्थानी येत असताना दुसरीकडे देशातून श्रीमंत नागरिक विदेशात वास्तव्यास जात आहेत. आकडेवारीनुसार २०२२ मध्ये हजारो करोडपतींनी भारताला बाय बाय केलं आहे. देशातून श्रीमंत निघून जाण्याच्या यादीत रशिया पहिल्या क्रमांकावर असून चीनचा दुसरा क्रमांक लागतो. तर, भारत तिसऱ्या स्थानी आला आहे.
बिझनेस इनसायडरच्या वृत्तानुसार, हेनले अँड पार्टनर्सच्या अहवालाच्या आधारे आकडेवारी समोर आली आहे. त्यात, भारतासह अनेक देशांतील करोडपती नागरिक आपला देश सोडून विदेशात गेल्याचे दिसून येतं. याच अहवालानुसार गतवर्षात भारतातून कोट्यधीश असलेल्या ८ हजार नागरिकांनी देश सोडला आहे. यात रशिया पहिल्या क्रमांकावर असून रशियातून १५ हजार तर चीनमधून १० हजार कोट्यधीश नागरिकांनी देश सोडून परदेशात वास्तव्यास जाण्याचं पसंत केलं आहे.