Join us

झोमाटोच्या ‘गोल्ड डिलिव्हरी’ सेवेतून ८ हजार हॉटेल बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 4:01 AM

‘डाइन-इन’ सेवेवरील हॉटेलचालकांच्या बहिष्कारानंतर फूड अ‍ॅग्रीगेटर कंपनी झोमाटोची घरपोच खाद्यपदार्थ पुरवठा सेवाही संकटात सापडली आहे.

नवी दिल्ली : ‘डाइन-इन’ सेवेवरील हॉटेलचालकांच्या बहिष्कारानंतर फूड अ‍ॅग्रीगेटर कंपनी झोमाटोची घरपोच खाद्यपदार्थ पुरवठा सेवाही संकटात सापडली आहे. देशभरातील ८ हजार हॉटेलमालक व चालक सदस्य असलेल्या ‘इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन’ने (एएचएआर) झोमाटोच्या ‘गोल्ड प्रोग्राम’अंतर्गत सुरू असलेल्या डिलिव्हरी सेवेवर बहिष्कार घातला आहे.असोसिएशनचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. संतोष शेट्टी यांनी सांगितले की, झोमाटो बेकायदेशीररीत्या चालविल्या जाणाऱ्या किचन्सकडून खाद्यपदार्थ बनवून घेत आहे. झोमाटो गोल्ड मेंबर्ससाठी कंपनी मोठी सूट देत असल्याचे दिसून आले आहे, तसेच त्यांच्याकडे डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हचीही कमतरता असल्याचेही लक्षात आले आहे. त्यामुळे आम्ही झोमाटोच्या खाद्यपुरवठा सेवेवर तत्काळ प्रभावाने बहिष्कार टाकीत आहोत.आम्ही कंपनीला या आधीच स्पष्टपणे सांगितले होते की, ‘झोमाटो गोल्ड डिलिव्हरी’ सेवेच्या आम्ही पूर्णत: विरोधात असून ही सेवा तत्काळ बंद करण्यात यावी. तथापि, फूड अ‍ॅग्रीगेटर कंपनीकडून त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आम्हीच या योजनेवर बहिष्कार टाकीत आहोत, असेही संतोष शेट्टी यांनी सांगितले.सूत्रांनी माहिती दिली की, गोल्ड सेवेंतर्गत सदस्य ग्राहकांना आॅर्डर दिल्यावेळीच झोमाटोकडून एक डिश मोफत दिली जात असते. सप्टेंबरमध्ये आपल्या ‘डाइन-इन’ सेवेवर रेस्टॉरंट्सनी बहिष्कार घातल्यानंतर झोमाटोने गोल्ड योजनेवर खाद्य पुरवठा सुरू केला होता. २०१७ मध्ये झोमाटोने गोल्ड सेवा सुुरू केली होती. तेव्हापासूनच या योजनेला रेस्टॉरंट उद्योगाने विरोध करणे सुरू केल्याचे दिसून आले होते.रेस्टॉरंट्सना काहीच फायदा नाहीशेट्टी यांनी सांगितले की, आम्ही ‘झोमाटो गोल्ड डायनिंग’ सेवेच्या विरोधात नाही. आम्ही यातील केवळ डिलिव्हरी सेवेच्या विरोधात आहोत. या योजनेत हॉटेल व रेस्टॉरंट्सला काहीच लाभ नाही. ही योजना केवळ फूड अ‍ॅग्रीगेटर कंपनीच्या फायद्याची आहे.

टॅग्स :झोमॅटोव्यवसाय