वॉशिंग्टन : भारतातील जन धन योजनेंतर्गतच्या नव्या २४ कोटी खात्यांपैकी ८० खाती ही सक्रीय असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. दरम्यान, प्रतिकूल परिस्थितीतही चांगल्या आर्थिक प्रगतीची अपेक्षा करणारा भारत सद्या जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. अर्थात, सद्याचा वृद्धीदर हा पर्याप्त नाहीये, असेही ते म्हणाले.
अरुण जेटली हे एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीसाठी आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘प्रधानमंत्री जन धन योजनेतील नव्या खात्यांपैकी ८० टक्के खात्यांवर पर्याप्त रक्कम आहे आणि ही खाती सक्रीय आहेत. यातील बहुतांश खात्यांवर पर्याप्त रक्कम नव्हती, पण केंद्र सरकारच्या अन्य स्रोतांच्या माध्यमातून या खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे. एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून आम्ही ही योजना चालवित आहोत.’ (वृत्तसंस्था)
नवे औद्योगिक धोरण उद्योजकांना आकर्षित करेल - नारायणसामी
पदुचेरी : नवे औद्योगिक धोरण उद्योजकांना आकर्षित करणारे असेल असे मत मुख्यमंत्री नारायणसामी यांनी व्यक्त केले. देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणूकदारांना यातून आकर्षित करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारने अडीच कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या निर्यात सुविधा केंद्राचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. उद्योजकांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच यंदाच्या अर्थसंकल्पात नवे औद्योगिक धोरण आखण्यात आले आहे. देशातील आणि देशाच्या बाहेरील उद्योजकांनी येथे गुंतवणूक करावी, हा या मागचा हेतू आहे. उद्योग प्रकल्पांना आम्ही प्रोत्साहित करू इच्छितो. (वृत्तसंस्था)