नवी दिल्ली : नोटाबंदीनंतरच्या काळात आयकर विभागाने नोटिसा बजावूनही ८0 हजार लोकांनी आयकर विवरणपत्रे भरली नसल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. येथील प्रगती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर’मध्ये एका स्टॉलचे उद्घाटन करताना केंद्रीय थेट कर बोर्डाचे चेअरमन सुशील चंद्रा म्हणाले की, २0१६ मधील नोटाबंदीमुळे कर आधार वाढण्यास खरोखरच मदत झाली आहे. थेट करांद्वारे मिळणारा देशाचा महसूलही वाढला आहे. गेल्या वर्षीचे थेट करांचे योगदान ५२ टक्के राहिले. त्या तुलनेत अप्रत्यक्ष करांचे योगदान ४८ टक्केच होते. अनेक वर्षांनंतर अप्रत्यक्ष करांपेक्षा थेट करांचे प्रमाण जास्त राहिले. नोटाबंदीमुळेच हे घडू शकले. पैसा थेट बँकांमध्ये येत असल्याने त्याचा माग काढणे सोपे झाले आहे.
चंद्रा म्हणाले की, नोटाबंदीनंतर मोठ्या रकमा जमा करूनही आयकर विवरणपत्रे न भरणाऱ्या सुमारे ३ लाख लोकांना आम्ही नोटिसा बजावल्या होत्या. यापैकी २.२५ लाख लोकांनी विवरणपत्रे भरली. ८0 हजार लोकांनी नोटिसा मिळाल्यानंतरही विवरणपत्रे भरलेली नाहीत. या प्रकरणांचा आयकर विभाग पाठपुरावा करीत आहे. यंदा वेळेवर विवरणपत्रे न भरणाºया लोकांचाही आम्ही पाठपुरावा करीत आहोत, असे ३0 लाख लोक आमच्या निदर्शनास आले आहेत. त्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.