Zerodha News : झिरोदा देशातील सर्वात मोठ्या ब्रोकिंग फर्मपैकी एक आहे. सध्या झिरोदासाठी एक दिलासादायक बातमी समोर आलीये. झिरोदाच्या नफ्यात ६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचा नफा २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६२ टक्क्यांनी वाढून ४,७०० कोटी रुपये झाला आहे. ब्रोकरेज फर्मने २५ सप्टेंबर रोजी ही माहिती दिली. या कालावधीत कंपनीचा महसूल २१ टक्क्यांनी वाढून ८,३२० कोटी रुपये झाला आहे. "आमचा आर्थिक ट्रॅक रेकॉर्ड चांगला राहिला आहे. २०२३-२४ हे आर्थिक वर्ष महसूल आणि नफा या दोन्ही दृष्टीनं जबरदस्त होतं," अशी प्रतिक्रिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामथ यांनी दिली.
ऑपरेटिंग मार्जिन ५७ टक्के
या नफ्यात एक हजार कोटी रुपयांच्या न अनरिअलाइज्ड गेनचा समावेश नाही. याचे प्रतिबिंब आपल्या आर्थिक स्थितीत दिसून येईल असं कामथ म्हणाले. झिरोदा ही देशातील सर्वात मोठी डिस्काउंट ब्रोकर फर्म आहे. कंपनीनं कमावलेल्या नफ्यात त्याचे ऑपरेटिंग मार्जिन ५७ टक्के असल्याचं दिसून येतं. अनरिअलाइज्ड गेन जोडल्यास ऑपरेटिंग मार्जिन ६९ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. याची तुलना जगातील मोठ्या कंपन्यांच्या ऑपरेटिंग मार्जिनशी करता येईल.
मायक्रोसॉफ्टचे ऑपरेटिंग मार्जिन यंदा ४४ टक्के होते. अॅपलचे मार्जिन २९ टक्के, गुगलचे मार्जिन ३१ टक्के आणि अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचं मार्जिन ३७ टक्के होतं. जगातील आघाडीची चिपमेकर कंपनी एनव्हिडियाचं ऑपरेटिंग मार्जिन ६४ टक्के होतं.
सोनं आणि शेअर्समध्ये कंपनीची गुंतवणूक
अनरिअलाइज्ड गेन म्हणजे झिरोदाल आपल्या गुंतवणुकीवर होणारा नफा. झिरोदानं कंपनी म्हणून सोनं आणि शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. गेल्या तीन वर्षांचा नफा पाहिला तर कंपनीची नेटवर्थ त्याच्या कस्टमर फंडाच्या जवळपास ४० टक्के आहे. "यादृष्टीनं आम्ही ट्रेडिंगसाठी सर्वात सुरक्षित ब्रोकिंग फर्म बनलो आहोत," असं कामथ यांनी नमूद केलं.