मुंबई : रोजगाराच्या क्षेत्रामध्ये सप्टेंबर महिना हा चांगला राहिला आहे. या महिन्यात ८५ लाख नवीन नोकऱ्या मिळाल्या असून, बेरोजगारीचा दरही घटला आहे. विशेष म्हणजे या महिन्यातील सर्वाधिक रोजगार हे पगारदारांना मिळाले आहेत. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयए)ने सप्टेंबर महिन्यातील रोजगाराबाबतचा एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामध्ये वरील माहिती देण्यात आली आहे. या महिन्यामध्ये उपलब्ध झालेले रोजगार हे गेल्या २० महिन्यांमधील सर्वाधिक आहेत. मार्च, २०२० मध्ये देशामध्ये सुरू झालेल्या कोरोनानंतरची सर्वाधिक वाढ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या महिन्यामध्ये उपलब्ध झालेल्या रोजगारांपैकी सर्वाधिक रोजगार हे पगारदारांचे आहेत. ६९ लाख पगारदार नोकऱ्या मिळाल्या असून, अन्य रोजगार हे कमी आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये ७.७१ कोटी पगारदार होते. त्यांच्यामध्ये वाढ होऊन ही संख्या आता ८.४१ कोटींवर पोहोचली आहे. २०१९-२० मध्ये देशामध्ये ८.६७ कोटी पगारदार होते.