मुंबई : जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशातील डेबिट कार्डधारकांच्या संख्येत तब्बल १२ टक्के (१ कोटी १३ लाख) वाढ झाली असून ती संख्या ८६ कोटी ५३ लाखांवर गेली आहे. तर, याच कालावधीत क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येतही चार टक्क्यांनी (१० लाख) वाढ झाली. सद्यस्थितीत ५ कोटी ८६ लाख कार्ड देशातील नागरिकांच्या खिशात आहेत. या तिमाहीतली जवळपास निम्मी डेबिट कार्ड जनधन योजनेअंतर्गत देण्यात आली.
आरबीआयने दिलेल्या आकडेवारीचा आधार घेत वर्ल्डलाइन या संस्थेने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका सर्वेक्षण अहवालातून ही माहिती समाेर आली. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सुरू केल्या जाणाऱ्या बँक खातेदारांना रुपे कार्ड दिली जातात. जुलै महिन्यात या कार्डची संख्या २९ कोटी ४४ लाख हाेती. ती आता ३० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. डेबिट कार्डच्या संख्येत झालेल्या विक्रमी वाढीत या योजनेतील कार्डचा मोठा वाटा असल्याचे समजते.
गेल्या तीन महिन्यांत डेबिट कार्डच्या माध्यमातून १३० कोटी व्यवहार झाले असून त्यांची रक्कम १ लाख १३ हजार कोटी रुपये इतकी आहे. त्यापैकी ८५,७८६ कोटींचे सुमारे ४८ कोटी ६८ लाख व्यवहार हे पीओएस म्हणजेच पाॅइंट ऑफ सेल पद्धतीने झाले आहेत. पीओएसच्या माध्यमातून क्रेडिट कार्डच्या साहाय्याने झालेल्या व्यवहारांची संख्या १९ कोटी ७० लाख असून त्यातली देवाणघेवाण ६३ हजार कोटींची आहे. ई-काॅमर्समध्ये ती संख्या अनुक्रमे २२ कोटी ५७ लाख व्यवहार, ८४ हजार कोटींची उलाढाल अशी आहे.
ई-काॅमर्सच्या माध्यमातून ५५ कोटींचे व्यवहारई-काॅमर्सच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांची संख्या ५५ कोटी असली तरी त्यात १ लाख २७ हजार कोटींची देवाणघेवाण झाली आहे. यात एका कार्डहून दुसऱ्या कार्डवर केल्या जाणाऱ्या डिजिटल पेमेंटचाही समावेश आहे.