नवी दिल्ली : सन २०२२ हे वर्ष रोजगाराच्या क्षेत्रात राजीनाम्याची महालाट घेऊन आली असून, आगामी ६ महिन्यांत ८६ टक्के कर्मचारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना रोखण्यासाठी घसघशीत पगारवाढ देण्याच्या तयारीत असल्याची माहिती रोजगार व भरती क्षेत्रातील संस्था ‘मायकेल पेज’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
अहवालानुसार, अलीकडे भारतीय नोकरदारवर्ग काम आणि जगणे यात योग्य समतोल साधण्यावर, तसेच वैयक्तिक आनंदावर भर देताना दिसून येत आहे. त्यासाठी कमी वेतन स्वीकारण्याची, तसेच वेतनवाढ अथवा पदोन्नती नाकारण्याची तयारी असल्याचे ६१ टक्के लोकांनी सांगितले. वास्तविक कोविड-१९ साथीच्या काळात मागील २ वर्षांपूर्वीपासून संपूर्ण जगात हा कल नोकरदारांमध्ये दिसून येत आहे. सन २०२२ मध्ये मात्र त्याला अधिक गती मिळाली आहे.
अहवालात काय आहे?नोकरी बदलण्यामागे कंपनीची कार्यपद्धती, कोरोना काळातील धोरणे आणि कर्मचाऱ्यांची नाराजी या कारणांबाबत बोलले जाते. ११% जणांनी नोकरी बदलण्यासाठी ही कारणे दिली. सर्वाधिक लोक करिअरमधील प्रगती, जास्तीचा पगार, भूमिकेतील बदल व कार्य समाधान यासाठी नोकरी बदलतात.
कर्मचारी काय म्हणतात...कोरोना कार्यकाळात कंपन्यांनी स्वीकारलेल्या धोरणांमुळे कर्मचारी नाराज आहेत. त्यांना आनंददायक काम हवे आहे. मनासारखे जगता यावे यासाठी त्यांना आपल्या पद्धतीने काम हवे आहे. त्यासाठी नोकरी बदलण्याची तयारी आहे.
६१% लोक जगण्यातील समतोल साधण्यासाठी कमी वेतन स्वीकारण्यास तयार.
२९% कर्मचारी वेतन, बोनस व बक्षिसी यासाठी नोकरी बदलतात.
४३% लोक योग्य कंपनीत योग्य मूल्ये व संस्कृतीसह योग्य रोजगार यास प्राधान्य देतात.