Join us

कर्मचारी भविष्य निधीवर मिळणार ८.६५ % व्याज

By admin | Published: April 17, 2017 2:14 AM

कर्मचारी भविष्य निधीवरील (ईपीएफ) जमा रकमेवर, २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात ८.६५ टक्के व्याज देण्यास अर्थमंत्रालयाने श्रममंत्रालयाला परवानगी

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधीवरील (ईपीएफ) जमा रकमेवर, २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात ८.६५ टक्के व्याज देण्यास अर्थमंत्रालयाने श्रममंत्रालयाला परवानगी दिल्याचे समजते. या निर्णयाचा चार कोटींपेक्षा जास्त सदस्यांना लाभ होईल. अर्थमंत्रालयाने मजूर मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात वाढीव व्याजदरामुळे भविष्य निधीमध्ये घट व्हायला नको, असे निक्षून सांगितले आहे. ८.६५ टक्के व्याज देण्याचा निर्णय कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या विश्वस्त मंडळाने (सीबीटी) घेतला होता. ईपीएफओच्या अंदाजानुसार, ८.६५ टक्के व्याज दिल्यानंतरही निधी शिल्लक राहणार आहे. ईपीएफओने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वर्ष २०१६-२०१७ साठी ८.६५ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला होता व तो कमी करावा, असा अर्थमंत्रालयाचा आग्रह होता. अर्थमंत्रालयाने मजूर मंत्रालयाला केलेल्या शिफारशीत व्याजदर काय दिला जावा, याचा निर्णय मजूर मंत्रालयाने घ्यावा, परंतु वाढीव व्याज दिल्यानंतर निधीमध्ये काहीही घट व्हायला नको, एवढी काळजी घेतली जावी, असे म्हटले होते. अल्पबचतीवरील व्याजदराची बरोबरी साधणारा व्याजदर असावा, म्हणून विश्वस्त मंडळाने मान्य केलेल्या व्याजदरात काहीशी कपात करावी, असे अर्थमंत्रालयाने त्या आधी सूचवले होते.श्रममंत्री बंडारू दत्तात्रेय २०१६-२०१७ वर्षात ईपीएफओ सदस्यांना ८.६५ टक्के व्याज मिळावे, याचा आग्रह धरत होते. मध्यवर्ती विश्वस्त मंडळाने ८.६५ टक्के व्याज देण्याचे ठरवले होते.