8th Pay Commission Salary Hike: काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. यामुळे देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. 8 वा वेतन आयोग लागू होताच पगारात भरघोस वाढ होईल, अशी लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आशा आहे. दरम्यान, असे काही विभाग आहेत, जे 8 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणार नाहीत. म्हणजे 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतरही त्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार नाही.
कोणत्या कर्मचाऱ्यांना वगळणार?
सध्या देशात सातवा वेतन आयोग लागू आहे. हा वेतन आयोग 2014 मध्ये स्थापन करण्यात आला होता, तर 2016 मध्ये लागू करण्यात आला. साधारणपणे भारतात दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. देशातील पहिला वेतन आयोग 1946 मध्ये स्थापन करण्यात आला होता. दरम्यान, जे कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) किंवा कोणत्याही स्वायत्त संस्थेचे कर्मचारी आहेत किंवा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, ते वेतन आयोगाच्या कक्षेबाहेर आहेत. म्हणजे या लोकांना वेतन आयोग लागू होत नाही. त्यांच्या पगार आणि भत्त्यांचे नियम वेगळे आहेत. यामुळेच या लोकांना 8 वा वेतन आयोग लागू होणार नाही.
आठव्या वेतन आयोगात पगार कसा वाढणार?
8 व्या वेतन आयोगातील पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टर आणि भत्त्यांच्या आधारावर असेल. अहवालानुसार, 8 व्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर 1.92 ते 2.86 दरम्यान असू शकतो. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार थेट 18000 रुपयांवरून 51000 रुपयांपर्यंत वाढणार आहे. मात्र, 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर काय असेल हे अद्याप ठरलेले नाही.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?
फिटमेंट फॅक्टर हा गुणक आहे, ज्याचा उपयोग सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन सुधारण्यासाठी केला जातो. हे सध्याच्या मूळ वेतनावर लागू केले जाते, तर नवीन वेतन त्याच्या आधारावर मोजले जाते.
फिटमेंट फॅक्टरचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर होतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 15,500 रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 असेल, तर त्याचा एकूण पगार 15,500 × 2.57 = रुपये 39,835 होईल.