Join us

९ कोटी ग्राहकांनी निवडल्या वाहिन्या; आता ८ कोटी ग्राहकच राहिले शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 1:08 AM

आतापर्यंत देशातील १७ कोटींपैकी ९ कोटी केबल टीव्ही आणि डीटूएच ग्राहकांनी आपल्या आवडीच्या वाहन्यांची निवड करून नवी पद्धत स्वीकारली आहे, असा दावा ट्रायने केला आहे.

नवी दिल्ली : आतापर्यंत देशातील १७ कोटींपैकी ९ कोटी केबल टीव्ही आणि डीटूएच ग्राहकांनी आपल्या आवडीच्या वाहन्यांची निवड करून नवी पद्धत स्वीकारली आहे, असा दावा ट्रायने केला आहे.

ट्राय’चे अध्यक्ष रामसेवक शर्मा यांनी सांगितले की, आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक ग्राहकांनी नवी पद्धत स्वीकारली आहे. अनेक ग्राहकांनी सहा महिने वा वर्षाची रक्कम एकाच वेळी भरलेली असते. त्यामुळे असे ग्राहक नव्या पद्धतीत येण्यास वेळ लागू शकेल. आतापर्यंत ज्या ९ कोटी ग्राहकांनी नव्या पद्धतीनुसार वाहिन्यांची निवड केली, त्यातील अडीच कोटी ग्राहक डीटूएचचे आहेत, तर साडेसहा कोटी ग्राहक केबल टीव्हीचे आहेत.

१७ कोटींपैकी ७ कोटी ग्राहक डीटूएचचे आहेत. यात ठरावीक काळासाठी रक्कम भरलेली असते. अशा ग्राहकांची संख्या किती आहे, हे समजणे अवघड आहे, पण त्यांनी भरलेले शुल्क संपताच, तेही नव्या पद्धतीत येतील, असे शर्मा म्हणाले.खर्च वाढला की कमी झाला?

या नव्या पद्धतीमुळे ग्राहकांचा खर्च किमान २५ टक्क्यांनी कमी झाला आहे, असा दावाही ट्रायने केला आहे. मात्र, हा दावा क्रिसिलने फेटाळला आहे.

ग्राहकांचा खर्च अजिबात कमी झालेला नाही आणि विविध वाहिन्या तसेच त्यांची पॅकेजेस निवडताना ग्राहकांना अडचणी येत आहेत आणि डीटूएच कंपन्याही अधिक रक्कम घेत आहेत, असे अनेकांचे म्हणणे आहे. काही वाहिन्यांनी तात्पुरत्या ऑफर्स दिल्या आहेत. त्यामुळे महिन्याचे बिल कमी झाल्याचे दिसते, पण तीन महिन्यांनी ऑफर्स संपताच ग्राहकांच्या खिशाला आणखी चाट बसू शकेल, असे बोलले जाते.

टॅग्स :तंत्रज्ञानटेलिव्हिजनट्राय