लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सात वर्षांपूर्वी स्टार्टअप इंडियाची सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत देशात ८६,७१३ स्टार्टअप कंपन्यांना मान्यता मिळाली आहे. या कंपन्यांनी नऊ लाख लोकांना रोजगार दिला आहे. मात्र, असे असतानाही देशातील बेरोजगारी केवळ १ टक्क्यानेच कमी झाली आहे. या क्षेत्रात महाराष्ट्राने बाजी मारली आहे.
जानेवारी २०१६ मध्ये बेरोजगारीचा दर ८.७ टक्के होता. मार्च २०२३ मध्ये तो ७.८ टक्के झाला. यावरून असे दिसते की, बेरोजगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्टार्टअप कंपन्या उपयुक्त आहेत. तथापि, रोजगार निर्मितीसाठी सरकारांनी इतरही पावले उचलण्याची गरज आहे.
स्मार्टफाेन उत्पादक कंपनी ॲपलही कर्मचारी कपात करणार आहे. डेव्हलपमेंट, रिटेल स्टाेर्स तसेच सुविधा केंद्रांमधील नारळ दिला जाऊ शकताे. किती कर्मचाऱ्यांना काढणार आहे, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, कंपनीने पुन्हा अर्ज करण्याची सूचना केली असून, तसे न केल्यास कामावरून काढण्यात येईल, असा इशारा दिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
२०२२मध्ये सर्वाधिक मान्यता
सर्वाधिक २६,५५८ स्टार्टअप कंपन्या २०२२ मध्ये सुरू झाल्या. २०२० ते २०२२ या कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात ३४,६०१ स्टार्टअप कंपन्यांना मान्यता मिळाली.
महाराष्ट्र येथेही आघाडीवरच
महाराष्ट्रात सर्वाधिक १५,५७१ स्टार्टअप आहेत. त्यांनी मागील तीन वर्षांत १.१८ लाख रोजगार दिले. तरीही मागील सात वर्षांत राज्यातील बेरोजगारी वाढली आहे.
बेरोजगारी
- जानेवारी २०१६ मध्ये महाराष्ट्रातील बेरोजगारी ४.६% होती. मार्च २०२३ मध्ये ती वाढून ५.५% झाली.
- या काळात युपीतील बेरोजगारीचा दर १५ टक्क्यांवरून ५.५ टक्के झाला.
- गुजरातमध्ये तो ३.४ टक्क्यांवरून १.८% आणि कर्नाटकात ६.४%वरून २.३% झाला.
- ही राज्ये सर्वाधिक स्टार्टअप असलेल्या टॉप-५ मध्ये आहेत.
आयटीत सर्वाधिक स्टार्टअप
३० डिसेंबर २०२२ पर्यंत देशातील ५६ क्षेत्रात ८६,७१३ स्टार्टअप कंपन्यांना मंजुरी दिली आहे. २०१६ मध्ये आकडा ४४५ इतका होता.
- १०,४१९-आयटी
- ८,०८८-आरोग्य
- ५,६५०-शिक्षण
- ४,२६६-कृषी
- ४,१८१-खाद्यपेय पदार्थ
- १,५४०-एआय क्षेत्र
- ४७२-राेबाेटिक्स
(डीपीआयआयटीचे सर्वेक्षण)