जिओ, एअरटेल आणि व्ही सारख्या आघाडीच्या मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांनी कॉलचे दर मागच्या महिन्यात १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढवले. पण प्रत्यक्षात मोबाइल वापरकर्ते कॉल ड्रॉपच्या समस्येमुळे हैराण झाले आहेत. प्रत्येक १० मोबाइल धारकांमागे ९ जण यामुळे त्रासले आहेत.
मागील तीन महिन्यांत ८९ टक्के वापरकर्त्यांना कॉल ड्रॉपचा त्रास सहन करावा लागला असल्याचं सोमवारी जारी झालेल्या एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. ऑनलाईन सर्व्हेक्षण करणारी फर्म लोकस सर्कलने हा अहवाल तयार केला आहे. मोबाइल नेटवर्कच्या आधारे कॉल करताना कनेक्टिव्हिटीसोबत कॉल ड्रॉपची समस्या भेडसावत असल्यानंच ग्राहक अन्य पर्यायांचा विचार करू लागले आहेत, असं यात म्हटलं आहे.
अहवाल काय सांगतो?
- ८९ टक्के युजर्सना दुसऱ्याशी बोलणे सुरु असताना याचा फटका बसला.
- ३८ टक्के जणांचे बोलणे सुरु असताना २०% कॉल ड्रॉप झाले.
- १७ टक्के जणांचे ५०% हून अधिक कॉल्सवेळी कॉल ड्रॉपचा झाले.
- २१ टक्के जणांचे २० ते ५० टक्के कॉल बोलताना कट झाले.
पाहणीत किती जणांचा सहभाग?
देशातील ३६२ जिल्ह्यांमध्ये ही पाहणी करण्यात आली. तब्बल ३२ हजार युजर्सची मतं या पाहणीत जाणून घेण्यात आली आहेत. कॉलचा दर वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली होती.
बहुतांश मोबाइल युजर्सना कॉल कनेक्शन आणि कॉल ड्रॉपची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे युजर्स आता महत्त्वाच्या कॉलसाठी इंटरनेट कॉल, व्हॉटस्ॲप कॉलिंग किंवा ओटीटी ॲपकडे वळू लागले आहेत.सचिन तपारिया, संस्थापक, लोकल सर्कल