दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या महासाथीनं देशातच नाही तर जगभरात हाहाकार माजवला होता. यात अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांनाही गमावलं. याच कालावधीत जीवन विम्याला लोकांनी अधिक प्राधान्य दिलं. बहुतांश लोकांना जीवन विमा हा आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबीयांसाठी किती महत्त्वाचा आहे याची जाणीवही झाली. कोरोना महासाथीच्या कालावधीत जीवन विमा घेणाऱ्या व्यक्तींच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ झाली. असं असलं तरी, ही संख्या तुलनेनं कमीच आहे आणि त्यामुळेच जीवन विमा घेण्याच्या महत्त्वाबाबत जागरुकता निर्माण करणं तितकंच गरजेचंही आहे.
जीवन विमा परिषदेनं (लाईफ इन्शुरन्स कौन्सिल) जीवन विम्या प्रति भारतीयांची धारणा समजण्यासाठी ४० शहरांमध्ये सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात १२ हजारांपेक्षा अधिक लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले. हे सर्वेक्षण लाईफ इन्शुरन्स कौन्सिलची नवी जागरुकता मोहीम 'सबसे पहले जीवन विमा' यावर आधारित आहे. भारतातील सर्वच वयोगटातील लोक जीवन विम्याला एक महत्त्वाचं वित्तीय साधन मानत असल्याचं या सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून दिसून आलं आहे. बहुतांश लोकांनी विमा खरेदी आवश्यक असण्याबाबत काही कारणं सांगितली. यात अनपेक्षित घटनांमध्ये संरक्षण, भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता आणि कुटुंबाचं सामूहिकरित्या वित्तीय ध्येय गाठणं यांसारख्या कारणांचा समावेश आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ७० टक्के लोक जीवन विमा खरेदी करण्यास इच्छुक असल्याचं दिसून आलं.
कोरोना महासाथीच्या कालावधीत जीवन विम्याची निवड करणाऱ्या लोकांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली. असं असलं तरी ही संख्या तुलनेनं कमी असून लोकांमध्ये जागरुकता वाढवण्याची अधिक गरज आहे. सर्वेक्षणात ९१ टक्के लोकांनी जीवन विमा आवश्यक असल्याचं सांगितलं. परंतु केवळ ७० टक्के लोकांनीच यात गुंतवणूक करण्यात रस दाखवला. पश्चिमी बाजारपेठेच्या निष्कर्षांवरून असं समोर आलं की, मोठ्या प्रमाणात लोकांना जीवन विम्याबद्दल माहितीही आहे आणि ते यात गुंतवणूक करण्यासही उत्सुक आहे. पश्चिमेकडील बाजारपेठेतील ४५ टक्के लोकांना इक्विटी आणि शेअर्सची माहिती असल्यानं त्यांच्या गुंतवणुकीची मानसिकता दिसून आली. ही आकडेवारी अन्य क्षेत्रांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. या ठिकाणी जीवन विम्यामध्ये गुंतवणूक केलेल्यांची संख्याही अधिक दिसून आली.
मुंबई, अहमदाबाद, पुणे यासारख्या शहरांमध्ये जीवन विमा असलेल्याची संख्या अधिक आहे. ९२ टक्के लोक जीवन विमा आपल्यासाठी आवश्यक असल्याचं मानतात. हीच बाब ८० टक्के व्यक्तींच्या मित्र आणि कुटुंबीयांना जीवन विम्याची शिफारस करण्याच्या इच्छेमधूनही दिसून आली. तर या तुलनेत देशभरातील हे प्रमाण ७६ टक्के आहे.
'जीवन विम्यामुळे कुटुंबीयांचं रक्षण'या सर्वेक्षणात पुण्यातील ७३ टक्के लोकांनी जीवन विमा क्लेम प्रक्रिया सुलभ असल्याचं म्हटलं. तर सर्वेक्षणादरम्यान, अहमदाबादमधील ८२ टक्के लोकांनी कोरोना महासाथीनंतर जीवन विम्याला अधिक महत्त्व मिळाल्याचं सांगितलं. कोलकात्यातील ८१ टक्के लोकांनी जीवन विमा हा एक गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय असल्याचं सांगितलं. ६१ टक्के पालकांचा असा विश्वास आहे की जीवन विमा त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि लग्नाच्या खर्चात मदत करतो. जीवन विमा वृद्धापकाळासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करतो असं बंगळुरूमधील ६८ टक्के जोडप्यांनी सांगितलं. हैदराबादमधील ६९ टक्के लोकांनी जीवन विमा विकत घेणं सोप असल्याचं सांगितलं. तर ८६ टक्के मुंबईकरांनी जीवन विमा त्यांच्या कुटुंबीयांचं रक्षण करत असल्याचं म्हटलं.
सर्वेक्षणातून काय आलं समोर?
- इतर सर्व आर्थिक साधनांच्या तुलनेत वैश्विक स्तरावर जवळपास ९६ टक्के लोकांमध्ये जीवन विम्याबाबत जागरुकता आहे. यात म्युच्युअल फडांमध्ये ६३ टक्के आणि इक्विटी शेअर्समध्ये ३९ टक्के लोकांमध्ये जागरुकता असल्याचं दिसून आलं.
- आर्थिक साधन म्हणून जीवन विम्याचे महत्त्व सर्व वयोगटातील पुरुष आणि महिलांमध्ये बहुतांश प्रमाणात सारखंच आहे.
- तरुणांच्या तुलनेत ३६ वर्षांमध्ये अधिकाधिक व्यक्ती जीवन विमा घेतात. निम्मे ग्राहक इन्शुरन्स एजंट्सकडून जीवन विमा घेण्यास पसंती देतात, तर १० पैकी ३ जण बँकांना पसंती देतात.
- विविध ऑफरिंग्स, लाभ आणि प्रीमिअमची तुलना करू शकत असल्यानं तरुण ग्राहक ऑनलाइन पद्धतीनं जीवन विमा पॉलिसी खरेदी करण्याला पसंती देतात.
- तर आपल्या कुटुंबातील व्यक्तीनं जीवन विमा घेतला आहे आणि त्यांना याबाबत अधिक माहित आहे, असा दावा ४७ टक्के लोकांनी केला आहे.
जागरुकता आणि माहितीसाठी सर्वेक्षण - एस.एन. भट्टाचार्य"आम्ही प्रामुख्यानं भारतीय ग्राहकांमध्ये जीवन विम्याबाबत समज, जागरुकता आणि माहिती जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण केलं आहे, भारतीय कुटुंबातील कमावणारा प्रत्येक सदस्य आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षित आणि आरोग्यदायी भविष्यासाठी जीवन विम्याला प्राधान्य देण्यासंदर्भात खात्री घेण्याचे आमचे ध्येय आहे. काळजी आणि जबाबदारी दोन्ही महत्त्वाचे आहेत. याचसोबत आम्ही देशवासीयांना शिक्षितही करु इच्छितो, जेणेकरून आम्ही सर्वोत्तम जीव विमा सोल्युशन पुरवू शकू," अशी प्रतिक्रिया लाईफ इन्शुरन्स कौन्सिलचे महासचिव एस.एन.भट्टाचार्य यांनी दिली.
“To know more about life insurance please visit sabsepehlelifeins.com”