नवी दिल्ली - भारतीय रुपयासाठी चालू आर्थिक वर्ष आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. अनिवासी भारतीयांना भारतात गुंतवलेली 94 अब्ज डॉलरची गुंतवणूक यावर्षी मॅच्युअर होणार असून, त्यांनी ही गुंतवणूक काढून घेतल्यास रुपयाचे मूल्य कोलमडण्याची शक्यता आहे. अनिवासी भारतीयांकडून भारतात गुंतवलेली रक्कम एकाच वेळी काढून घेण्यात येणार नाही. मात्र पाश्चिमात्य देश आणि भारतामधील व्याजदरात फारसा फरक न राहिल्याने काही खाती बंद होऊ शकतात. बरेच अनिवासी भारतीय दीर्घकालीन गुंतवणुकीपेक्षा कमी कालावधीची गुंतवणूक करण्यावर भर देतात. आता घटत असलेला व्याजदरही यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. रिझर्व्ह बँकेने 2019 या आर्थिव वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार अनिवासी भारतीयांचे सुमारे 130.4 अब्ज डॉलर रुपये बँक खात्यात जमा आहेत. त्यामधील 94 अब्ज डॉलरची गुंतवणूक यावर्षी मॅच्युअर होणार आहे. अर्थजगतातील विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार हा आकडा सकृतदर्शनी धोक्याचा इशारा देणारा वाटतो. मात्र यापैकी 90 टक्के रक्कम पुन्हा गुंतवली जाते. मात्र अनिवासी भारतीयांच्या एकूण गुंतवणुकीमध्येकमी कालावधीसाठीच्या डिपॉझिटची संख्या वाढत आहे. अनिवासी भारतीयांच्या एकूणऩ गुंतवणुकीत एक वर्षाची मॅच्युरिटी कालावधी असणाऱ्या डिपॉझिटची संख्या मार्च 2015 मध्ये 51 टक्के होती. आता मार्च 2019 मध्ये हीच आकडेवारी वाढून 72 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. परदेशातील आणि भारताती व्याजदरांमध्ये फरक असल्याने अनिवासी भारतीयांकडून भारतीय बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असते. मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणामधून व्याजदरांच्या घसरणीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनिवासी भारतीयांकडे भारतात गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळवण्याची संधी राहणार नाही.
एनआरआयची भारतात आहे तब्बल 94 अब्ज डॉलरची गुंतवणूक, काढून घेतल्यास रुपया कोलमडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 4:51 PM