मुंबई - भारतातील 94 टक्के आयटी पदवीधर हे देशातील बड्या आयटी कंपन्यामध्ये नोकरी करण्यास अपात्र असल्याचा दावा टेक महिंद्राचे सीईओ सी.पी. गुरनानी यांनी केला आहे. गुरनानी हे टेक महिंद्रामध्ये पुढील स्तरावली विकासाची पायाभरणी करत आहे. तसेच टेक महिंद्राच्या पुढील पिढीचा आराखडा तयार करण्यामध्ये गुंतलेले आहे.
मॅनपॉवर स्किलिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग अशा नव्या तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्याचे आव्हान भारतीय आयटी कंपन्यांसमोर आहे. त्यामुळे या सर्वांना विचारात घेऊन नोकरी देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मोठ्या आयटी कंपन्या भारतातील 94 टक्के आयटी पदवीधर विद्यार्थ्यांना नोकरीसाठी निरुपयोगी मानतात, असे सी. पी. गुरनानी यांनी सांगितले.
गुरनानी पुढे म्हणाले, ''मी तुम्हाला दिल्लीसारख्या शहराचे उदाहरण देतो. सध्या येथे 60 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून बीए करण्यासाठीसुद्धा प्रवेश मिळत नाही. मात्र याच विद्यार्थ्याला इंजिनियरिंगसाठी नक्कीच प्रवेश मिळतो. मग आम्ही बेरोजगार बनून राहण्यासाठी या विद्यार्थ्यांना इंजिनिअर बनवत आहोत का, कारण भारती आयटी उद्योगामध्ये सध्या कौशल्याला मागणी आहे."
"2022 पर्यंत सायबर सिक्युरिटीमध्ये सुमारे 6 मिलीयन म्हणजेच 60 लाख कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, असे नासकॉमचे म्हणणे आहे. मात्र आमच्याकडे कौशल्याची वानवा आहे. जर तुम्ही टेक महिंद्रामध्ये आलात. तर येथे मी पाच एकरच्या क्षेत्रामध्ये बनवलेले टेक आणि लर्निंग सेंटर तुम्हाला दिसेल. अन्य आघाडीच्या कंपन्यांनीसुद्धा कर्मचाऱ्यांमधील कौशल्याची वाढ करण्यासाठी अशाप्रकारच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. शिकण्याची योग्यता, कौशल्य विकास आणि बाजारासाठी तयार होण्याचा भार आयटी उद्योगावर पडत आहे. मात्र असे असले तरी आघाडीच्या 10 आयटी कंपन्या इंजिनियरिंगमध्ये पदवी मिळवणाऱ्या केवळ 6 टक्के विद्यार्थ्यांना घेत आहेत. मग बाकी 94 टक्के विद्यांर्थ्यांचे काय होते?" असा सवालही गुरनानी यांनी यावेळी विचारला.
भारतातील 94 टक्के आयटी पदवीधर नोकरीस अपात्र
भारतातील 94 टक्के आयटी पदवीधर हे देशातील बड्या आयटी कंपन्यामध्ये नोकरी करण्यास अपात्र असल्याचा दावा टेक महिंद्राचे सीईओ सी.पी. गुरनानी यांनी केला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 05:12 PM2018-06-04T17:12:52+5:302018-06-04T17:12:52+5:30