चंद्रकांत दडस
मुंबई :
भारताने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत अनेक क्षेत्रात आघाडी घेतली आहे. याचवेळी आर्थिक विकास झाल्याने नागरिकांच्या घरातील वस्तूंची संख्याही वाढली आहे. देशातील तब्बल ९५.५ टक्के जनतेच्या हातात मोबाईल पोहोचला आहे. असे असले तरीही देशातील केवळ ४८ टक्के लोकच इंटरनेट वापरत आहेत. शिक्षणासाठी संगणकाचा वापरही कमी होत असल्याचे समोर आले आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. अहवालानुसार, देशातील २.३ टक्के जनता अजूनही ब्लॅक ॲण्ड व्हाइट टीव्ही पाहते. तर ६६% लोकांच्या घरात रंगीत टीव्ही आहे. मनोरजंनासाठी टीव्ही मोठ्या प्रमाणात असला तरी शिक्षणासाठी संगणक घेणाऱ्यांची संख्या मात्र अतिशय तोकडी आहे.
बँक खातेधारक किती?
गेल्या काही वर्षांत बँक खातेधारकांची संख्या वाढवण्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्याला यश मिळाले असून, देशात बँक खाते अथवा पोस्टात खाते असणाऱ्यांची संख्या ९६% वर पोहोचली आहे.
- असे असले तरी देशात दारिद्र्य-रेषेखालील कुटुंबांचे प्रमाणही मोठे आहे. देशात एकूण ४५.१% जनतेकडे बीपीएल कार्ड आहे. शहराच्या तुलनेत बीपीएल कार्डधारक ग्रामीण भागात अधिक आहेत. शहरी भागात हे प्रमाण ३१% तर ग्रामीण भागात हे प्रमाण ५२.१% इतके मोठे आहे.
कुणाकडे काहीच नाही, असे किती?
देशात प्रवासासाठी वाहन नसणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तब्बल २४.३ टक्के जनतेकडे प्रवासासाठी कोणतेही वाहन नसून, त्यांना सार्वजिनक वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. चटई, कुकर, टीव्हीसह अन्य वस्तू नसणाऱ्यांची संख्याही ०.४% आहे.
केवळ ९.३% जनतेकडे संगणक आहेत. ग्रामीण भागात तर हे प्रमाण अतिशय नगण्य आहे.