मुंबई - एमडीएच मसाला कंपनीचे चेअरमन महाशय धर्मपाल यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाशय धर्मपाल हट्टी म्हणजेच एमडीएच मसाला कंपनीच्या उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. पद्मभूषण पुरस्कार मिळणार असल्याचे समजताच मला अत्यानंद झाला. मी खूप कष्ट घेतले आहेत. माणसाने कष्ट केलंच पाहिजे, सर्वांशी प्रेमानं वागलं पाहिजे. प्रेमानं सगळं काही मिळतं, अस महाशय धर्मपाल यांनी म्हटलंय.
अंगात पांढरा कुर्ता, सोबतीला जॅकेट आणि डोक्यावर लाल रंगाची पगडी परिधान केलेला साधारण माणूस टीव्हीवरील जाहिरातीत झळकला. पाहता- पाहता हा माणूस सर्वांचा लाडका बनला. आपल्या कष्टाच्या जोरावर एका मसाला कंपनीला जगभरात मान्यता मिळवून देण्याचं काम या माणसानं केलंय. 'असली मसाले सच सच, एमडीएच एमडीएच'.... अशी जिंगल बेल ऐकली तरी आपल्या डोळ्यासमोर महाशय धर्मपाल यांचा चेहरा उभारतो. एमडीएच मसाला कंपनीचे मालक गुलाटी हे 2 हजार कोटींचे मालक आहेत. केवळ चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या गुलाटी यांनी 2018 मध्ये वर्षाकाठी 25 कोटी रुपये पगार घेतला.
95 वर्षीय धर्मपाल हे जगातील सर्वात वयोवृद्ध अॅडव्हरटाईज स्टार आहेत. अगदी वयाच्या शंभरीकडे वाटचाल करत असतानाही ते जोशपू्र्ण आणि तंदुरुस्त आहेत. मी सकाळी 4 वाजता उठतो, त्यानंतर नेहरू पार्कमध्ये जाऊन 1000 पाऊले चालतो. पुन्हा घरी येऊन योगासनेही करतो. 'अभी तो मै जवान हूँ, मी म्हातारा नाही, असे धर्मपाल म्हणतात. तर, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आई-वडिलांची सेवा करा आणि कष्ट करत राहा, असा सल्लाही महाशय धर्मपाल यांनी तरुणाईला दिला आहे.
जोपर्यंत माणूस प्रामाणिक होत नाही, जोपर्यंत माणूस कष्टाळू होत नाही. सर्वांशी गोड बोलणार नाही, तोपर्यंत त्यास देवाचा आशीर्वाद मिळणार नाही. आई-वडिलांचा आशीर्वाद आणि देवाची कृपा यामुळेच मी यशस्वी झालो, असे पद्मभूषण पुरस्कारप्राप्त 95 वर्षीय महाशय धर्मपाल हट्टी यांनी म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारकडून महाशय धर्मपालजी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. पद्मभूषण हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे.