नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सीमधून (Cryptocurrency) अनेक लोक भरपूर कमाई करत आहेत. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणारे अनेक जण श्रीमंत झाले आहेत, तर दुसरीकडे काही लोकांना आर्थिक फटका सुद्धा बसला आहे. दरम्यान, तुम्ही क्रिप्टोकरन्सीवर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, मात्र तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. ही बातमी वाचल्यानंतर कदाचित तुम्हालाही क्रिप्टोबाबत विचार करण्यास भाग पडेल.
फास्ट फूड चेन मॅकडोनाल्डचे माजी कर्मचारी असलेल्या चांगपेंग झाओ (Changpeng Zhao) यांनी 2017 मध्ये Binance नावाचे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज (Cryptocurrency Exchange) सुरू केले. चांगपेंग झाओ हे क्रिप्टो स्पेसमध्ये CZ नावाने प्रसिद्ध आहेत. ब्लूमबर्गच्या ताज्या अंदाजानुसार, Binance CEO चांगपेंग झाओ यांची एकूण संपत्ती सध्या 96 बिलियन डॉलर्स आहे. रिपोर्टनुसार, आता चांगपेंग झाओ यांनी नेट वर्थच्या बाबतीत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे.
दरम्यान, ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या 9 जानेवारीच्या लिस्टनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 92.9 बिलियन डॉलर्स आहे, तर चांगपेंग झाओ यांची एकूण संपत्ती 96 बिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे. ब्लूमबर्गच्या अंदाजानुसार चांगपेंग झाओ हे मुकेश अंबानींच्या शीर्षस्थानी पोहोचले आहेत. ब्लूमबर्गच्या या लिस्टमध्ये भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचाही समावेश आहे. अदानी यांची एकूण संपत्ती 78.6 बिलियन डॉलर्स आहे.
विशेष म्हणजे, चांगपेंग झाओ यांची क्रिप्टो एक्सचेंज Binance कंपनी 4.5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये सुरू झाली होती. तर या लिस्टमधील इतर लोकांच्या कंपन्या अनेक दशकांपासून सुरू आहेत. दरम्यान, चांगपेंग झाओ यांची एकूण संपत्ती ब्लूमबर्गच्या अंदाजापेक्षा खूप जास्त असू शकते. कारण, ब्लूमबर्गने चांगपेंग झाओ यांच्याद्वारे Bitcoin आणि Binance Coin मध्ये गुंतवलेले पैसे समाविष्ट केलेले नाहीत.
चांगपेंग झाओ यांच्या वैयक्तिक क्रिप्टोकरन्सी होल्डिंग्सचाही हिशोब केला असता, तर त्यांची एकूण संपत्ती बिल गेट्सइतकी असू शकते, असे सांगण्यात येत आहे. बिल गेट्स सध्या 134 बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार हा अंदाज चांगपेंग झाओ यांच्या Binance मधील स्टेकबाबत आहे. 2021 मध्ये Binance ने 20 बिलियनडॉलर्स कमाई केली असल्याचे सांगितले जात आहे. चांगपेंग झाओ यांच्याकडे या कंपनीचे 90% शेअर्स आहेत.