नवी दिल्ली : सरकारी कंपन्या असलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या स्थावर मालमत्तांची विक्री करून ९७० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा सरकारचा मानस आहे. त्याबाबतची माहिती गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्तांचे व्यवस्थापन विभाग (दीपम)च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुंबईसह हैदराबाद, चंदीगड, भावनगर आणि कोलकाता शहरांमधील मालमत्तांची विक्री केली जाणार आहे. सुमारे दीड महिन्यांच्या कालावधीत ही विक्री प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यामध्ये बीएसएनएलच्या ६६० कोटींच्या, तर एमटीएनएलच्या ३१० कोटी रुपयांच्या मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्तांचे हे केवळ आरक्षित मूल्य असून, प्रत्यक्षात त्यापासून अधिक प्रमाणात रक्कम उभारली जाण्याची शक्यता आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरातील वसारी हिल भागामध्ये असलेली मालमत्ता तसेच ओशिवरा परिसरातील एमटीएनएलचे १२ फ्लॅट विकण्यात येणार आहेत. यामधून एकूण ३१० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. या फ्लॅटचे मूल्य ५२.६० लाख रुपयांपासून १.५९ कोटी रुपयांपर्यंत आहे.
बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या संपत्तीचे रोखीकरण करण्याचा हा पहिला टप्पा आहे. सुमारे दीड महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. बाजाराच्या स्थितीनुसार आम्ही आणखी मालमत्तांचे रोखीकरण करू शकतो. तसा विचार सध्या सुरू आहे. - पी. के. पुरवार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, बीएसएनएल