Join us  

कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, अदानींची संपत्तीही हजारो कोटींनी घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 9:15 PM

अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात आज मोठी घसरण दिसून आली.

गेल्या आठवड्या जगातील श्रीमंताच्या यादीत मोठे बदल झाले होते, उद्योगपती गौतम अदानी यांना मागे टाकत अॅमेझॉनचे जेफ बेझोस पुढे गेले होते. आता पुन्हा या यादीत मोठा बदल झाला आहे. अॅमेझॉनचे सह-संस्थापक जेफ बेझोस भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना मागे टाकून जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. त्यानतंर, २४ तासातंच गौतम अदानींनी झेप घेत पुन्हा तिसरे स्थान गाठले होते. म्हणजेच, जगातील या टॉप उद्योगपतींच्या संपत्तीत तासा-तासाला मोठी उलाढाल होत असते. शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक असल्याने त्यांना कधीही फटकाही बसतो. गौतम अदानी यांच्या उद्योग समुहाला आज शेअर मार्केटमध्ये मोठे नुकसान झाले आहे. 

अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात आज मोठी घसरण दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या अदानी समूहाच्या 9 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. अमेरिकेतील Hindenburg Research LLC  ने अदानी समूहाबाबत जाहीर केलेल्या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअरवर परिणाम झाल्याचे उद्योग जगतात आणि शेअर बाजारात बोलले जात आहे. मात्र, अदानी समुहाने हा अहवाल एकदम फालतू असल्याचं म्हटलं आहे. 

हिंडनबर्गच्या अहवालानुसार, अदानी ग्रुपने आपल्या कंपन्यांना ८५ टक्क्यांपेक्षा अधिक मूल्यवान दाखविण्यात आले आहे. तसेच, अदानी समूह मोठ्या कर्जामुळे दबाबाखाली येऊ शकतो असे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे, हा अहवाल प्रसिद्ध होताच अदानींच्या कंपनींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.  

अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात झालेल्या घसरणीचा फटका कंपनीचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनादेखील बसला आहे. अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली. एकाच दिवसात अदानी यांच्या संपत्तीत 6.5 अब्ज डॉलरची (सुमारे 54000 कोटी रुपये) घट झाली आहे. दरम्यान, फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, गौतम अदानी यांची संपत्ती 5.17 टक्क्यांनी घटून ती 119.1 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. 

टॅग्स :गौतम अदानीअदानीशेअर बाजारमुंबई