Join us

सणापूर्वीच सर्वसामान्यांना मोठा धक्का! ६ वर्षात साखर महागली; वाचा नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 7:12 PM

सणापूर्वीच आता सर्वसामान्यांना महागाईचा धक्का बसणार आहे.

देशात गेल्या काही दिवसापासून महागाई वाढली आहे, यावर सरकार काम करत आहे. महागाई संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. टोमॅटोसह डाळींचे दर वाढत आहेत, या पार्श्वभूमीवर आता साखर पुन्हा एकदा महाग झाली आहे. गेल्या १५ दिवसांत त्याच्या किमतीत ३ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी साखरेचे दर ३७,७६० रुपये प्रति टन पर्यंत वाढले, जे ऑक्टोबर २०१७ नंतरचे सर्वोच्च आहे. विशेष म्हणजे साखरेच्या किमतीत ३ टक्क्यांनी वाढ झाल्याने गेल्या ६ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. मात्र, किरकोळ बाजारातील ग्राहकांवर याचा परिणाम होणार नाही.

साखरेच्या दरात वाढ झाल्यानंतर व्यापारी आणि उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे. देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्ये असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी आणि उत्पादकांचे म्हणणे आहे. पीक हंगाम २०२३-२४ मध्ये ऊस उत्पादनात घट झाल्यास साखर आणखी महाग होऊ शकते. त्याचबरोबर साखरेच्या किमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाई दर वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. याचा परिणाम खाद्यपदार्थांवर होऊ शकतात, खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात.

बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी याबाबत माहिती दिली आहे. जैन म्हणाले की, सप्टेंबर महिन्यातही पाऊस पडला नाही तर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे उसाचे उत्पादन घटू शकते, त्यामुळे साखरेचे भाव आणखी वाढणार आहेत. साखरेच्या दरात वाढ झाल्याने द्वारिकेश शुगर, श्री रेणुका शुगर्स, बलरामपूर चिनी आणि दालमिया भारत शुगर या उत्पादकांचे मार्जिन सुधारेल असे म्हणणे आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देऊ शकतील.

१ ऑक्टोबरपासून साखर उत्पादनाचा नवा हंगाम सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत कमी पावसामुळे साखरेचे उत्पादन ३.३ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन ३१.७ मिलियन मेट्रिक टनांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे.

अशोक जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरेचे दर असेच वाढत राहिले, तर केंद्र सरकार तिच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णयही घेऊ शकते. जेणेकरून देशांतर्गत बाजारात त्याच्या किमती कमी करता येतील. साखरेचा साठा कमी होत असल्याने येत्या काही महिन्यांत साखरेचे दर आणखी वाढू शकतात.

टॅग्स :ऊसमहागाई