Join us  

जोरदार नफावसुलीमुळे तेजीच्या बाजाराची आपटी; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७.९४ लाख कोटींची घट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 9:06 AM

शुक्रवारी गुंतवणूकदारांनी नफावसुलीवर भर दिल्याचे दिसले. विक्रीच्या जोरदार माऱ्यामुळे बाजारात घसरण झाली. सेन्सेक्समधील ३० पैकी २६ शेअर्समध्ये घसरण, तर ४ मध्ये वाढ झाली.

मुंबई : शेअर बाजारात सलग तीन दिवस दिसत असलेली तेजी शुक्रवारी कायम राहू शकली नाही. सेन्सेक्स दिवसभरात ८१,५८७ अंकांपर्यंत उसळला होता, परंतु दिवसअखेरीस ७३८ अंकांनी घसरून ८०,६०४ अंकांवर स्थिरावला. निफ्टीही २६९ अंकांनी घसरून २४,५३० अंकांवर स्थिरावला.

शुक्रवारी गुंतवणूकदारांनी नफावसुलीवर भर दिल्याचे दिसले. विक्रीच्या जोरदार माऱ्यामुळे बाजारात घसरण झाली. सेन्सेक्समधील ३० पैकी २६ शेअर्समध्ये घसरण, तर ४ मध्ये वाढ झाली. टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, सन फार्मा आणि पॉवरग्रीड या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. तर, एशियन पेंट्स, आयटीसी, नेस्ले, अदानी पोर्ट्स हे शेअर्स वाढले.

गुंतवणूकदारांचे असे झाले नुकसान

या घसरणीमुळे बाजारातील सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे भांडवली मूल्य घसरून ४४६ लाख कोटींवर आले. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७.९४ लाख कोटींची घट झाली आहे.

परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ५,४८३ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली, तर याच काळात देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २,९०४ कोटींच्या शेअर्सची विक्री केली.

आयटी इंडेक्स वगळता इतर सर्व प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण झाली. स्मॉलकॅप व मिडकॅपमध्ये ०.८ टक्के घसरण झाली. टेक शेअर्सही घसरले. आशियायी बाजारांमध्येही दुसऱ्या सत्रांमध्ये घसरणीचे चित्र दिसले.

टॅग्स :शेअर बाजारव्यवसाय