लोकमत न्यूज नेटवर्क : आयकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करण्याची अंतिम मुदत नुकतीच संपली. त्यानंतर सर्वांना प्रतीक्षा लागली आहे, ती कर परताव्याची. सामान्यतः विवरणपत्र दाखल केल्यानंतर ७ ते १२० दिवसांमध्ये परतावा दिला जातो. परंतु, त्यासाठी व्हेरिफिकेशन करण्याच्या नावाखाली बनावट मेसेज पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. संशयास्पद मेसेजला प्रतिसाद न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कसा होतोय गैरप्रकार?
आयकर विवरणपत्र भरल्यानंतर कर परताव्याची प्रतीक्षा असणाऱ्यांची फसवणूक करणारी यंत्रणा सक्रिय झाली आहे.
‘तुमचे आयटीआर मंजूर झाले असून, लवकरच आपल्या खात्यात परतावा जमा केला जाईल.
खाते क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करण्याचे आवाहन चोरट्यांकडून केले जात आहे.
पती की पत्नी? टर्म प्लॅन कोणी घ्यावा, किती आणि कसा घ्यावा; वाचा सविस्तर
कशी कराल तक्रार?
तुम्हालाही अशाप्रकारे खाते क्रमांक पडताळणीसाठी मेसेज आल्यास आयकर विभागाच्या १८००१०३००२५, १८००४१९००२५ या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले.
आयकर विभाग मेसेज पाठवित नाही
आयटीआर दाखल केल्यानंतर कर परताव्यासाठी बँक खाते क्रमांकांच्या पडताळणीसाठी कोणताही मेसेज पाठवत नसल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले. आयटीआरमध्ये दिलेल्या बँक खात्यावर निर्धारित वेळेत परतावा दिला जात असल्याचे स्पष्ट केले.
परताव्यास कधी उशीर होतो?
बँक खात्याचा तपशील चुकीचा असणे
अतिरिक्त दस्तऐवज/माहितीची आवश्यकता
परताव्यासाठी चुकीची माहिती देणे
टीडीएस/टीसीएसमध्ये असमानता
परतावा विनंती प्रक्रियेत असणे
आयटीआर व्हेरिफिकेशन का गरजेचे?
आयटीआर दाखल केल्यानंतर व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास दाखल केलेले आयटीआर कायदेशिर मानले जात नाही. त्यावर आयकर विभाग त्यावर प्रक्रिया करीत नाही. व्हेरिफिकेशन नेट बँकिंग, बँक एटीएम, आधार ओटीपी, बँक खाते आणि डी-मॅट अकाऊंट या पाच पर्यायांद्वारे करता येते.