Join us

Made In India Smartphone: भारतात चिनी कंपनी तयार करणार 'मेड इन इंडिया' स्मार्टफोन्स, ॲपलनंही पकडला स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 2:17 PM

भारतातील स्मार्टफोन मार्केट विदेशी कंपन्यांना खूप आकर्षित करत आहे. परदेशी कंपन्या भारतात आपला व्यवसाय वाढवण्याच्या दिशेनं पावलंही टाकतायत.

भारतातीलस्मार्टफोन मार्केट विदेशी कंपन्यांना खूप आकर्षित करत आहे. परदेशी कंपन्या भारतात आपला व्यवसाय वाढवण्याच्या दिशेनं पावलंही टाकतायत. अलीकडेच ॲपलनं भारतात त्यांची दोन स्टोअर्स उघडण्याची घोषणा केली आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन अॅपलनं मुंबई आणि दिल्लीत आपलं स्टोअर सुरू करण्याची तयारी केली. केवळ अॅपलच नाही तर आता चीनी स्मार्टफोन कंपनी विवोनेही या क्षेत्रात उडी घेतली आहे. Vivo ने या वर्षाच्या अखेरीस ११०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. विवो ग्रेटर नोएडा येथे आपला प्रकल्प उभारत आहे. २०२४ च्या सुरुवातीला या प्रकल्पातून उत्पादन सुरू करण्यात येईल.

भारतात आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी या वर्षाच्या अखेरीस आणखी ११०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo नं दिली. या अंतर्गत ग्रेटर नोएडामध्ये तयार होत असलेले युनिट २०२४ च्या सुरूवातीस उत्पादन सुरू करणार आहे. विवो इंडिया २०२३ मध्ये 'मेड इन इंडिया' स्मार्टफोनच्या १० लाख युनिट्सची निर्यात करण्याच्या मार्गावर असल्याचं सांगितलं. २०२२ मध्ये त्यांच्या 'मेड इन इंडिया' स्मार्टफोनची पहिली खेप थायलंड आणि सौदी अरेबियाला पाठवण्यात आली होती.

भारतीय बाजारपेठेवर लक्ष७५०० कोटी रुपयांच्या प्रस्तावित गुंतवणूक योजनेचा भाग म्हणून, विवो २०२३ च्या अखेरीस पहिल्या टप्प्यात ३,५०० कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करेल. कंपनीनं आधीच भारतात २४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि भारताला जागतिक निर्यात केंद्र बनवण्यासाठी २०२३ च्या अखेरीस अतिरिक्त ११०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय. ग्रेटर नोएडा येथील विवोच्या नवीन युनिटमध्ये उत्पादनाचे काम २०२४ च्या सुरुवातीला सुरू होईल अशी कंपनीची अपेक्षा आहे. यामध्ये अनिवार्य प्रशासकीय मान्यता मिळणं बाकी आहेत. 

ग्रेटर नोएडा येथे स्थित नवीन प्रकल्प १६९ एकरमध्ये पसरलेला आहे आणि सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर, दरवर्षी १२ कोटी स्मार्टफोन तयार करण्याची क्षमता असेल. कंपनीचे विद्यमान उत्पादन युनिटदेखील ग्रेटर नोएडामध्ये आहे. 

ॲपलचाही विस्तारभारतात आपल्या व्यवसायाचा विस्तार करणारी विवो ही एकमेव स्मार्टफोन कंपनी नाही. ॲपलनंही भारतात आपला विस्तार सुरू केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतात ॲपलच्या प्रोडक्ट्सचे उत्पादन तीन पटीनं वाढलंय. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये, भारत ७ बिलियन डॉलर्स किमतीच्या आयफोनचे उत्पादन करेल, जे ॲपलच्या जागतिक उत्पादनाच्या ७ टक्के आहे. तर २०२१ मध्ये ते फक्त १ टक्के होते. फॉक्सकॉन आणि पेग्राट्रॉन सारखे पुरवठादार अॅपलच्या उत्पादनात भारतातील उत्पादन युनिट्ससह मदत करत आहेत.

टॅग्स :विवोस्मार्टफोनभारतअॅपल