मुंबई - महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. आपल्या ट्विटरवरील चाहत्यांसाठी ते नवनवीन व्हिडिओ, कोट्स आणि माहिती शेअर करत असतात. अनेकदा चाहत्यांना बक्षीसही देऊ करतात. त्यामुळेच, महिंद्रा यांचा चाहता वर्गही त्यांना नियमितपणे फॉलो करतो. आता, दोन दिवसांपूर्वी आनंद महिंद्रांनी मायक्रोसॉप्टचे संस्थापक बिग गेट्स यांच्यासमवेतचा फोटो शेअर केला आहे. या भेटीत दोन्ही उद्योगपतींनी मनसोक्त गप्पा मारल्या आणि पुढील काळात एकत्र येत काय करायचं, यासंदर्भातील योजनाही आखल्या आहेत.
बिल गेट्स हे आपल्या अधिकृत भारत दौऱ्यावर आले असून २८ फेब्रुवारी रोजी त्यांनी आनंद महिंद्रा यांची भेट घेतली. तत्पूर्वी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची मुंबईतील कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर, आनंद महिंद्रांसोबत भेट झाली अन् विविध विषयांवर चर्चा झाली. स्वत: महिंद्रा यांनी ट्विटरवरुन फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. आमच्या दोघांमध्ये सखोल चर्चा झाली असून कुठल्याही उद्योगासाठी आम्ही एकत्र येत नाही. तर, सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी आपण कशारितीने काम करू, हीच चर्चा झाल्याचं महिंद्रा यांनी म्हटलं.
महिंद्रा यांनी गेट्स यांच्याकडून पुस्तक घेतानाचा फोटो आणि पुस्तकावर बिल गेट्स यांची सही असल्याचा फोटो शेअर केला आहे. महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोवर बिल गेट्स यांची सही असून आनंद महिंद्रा हे गेट्स यांचे वर्गमित्र असल्याचं त्यांनी म्हटलंय. To, Anand Best Wishes to my classmate असे शब्द लिहित गेट्स यांनी महिंद्रांना दिलेल्या पुस्तकावर सही केली आहे.
बिल गेट्स हे Microsoft फर्मचे सह-संस्थापक असून ते लोकप्रिय कंप्यूटर ऑपरेटिंग सिस्टम (OS) विंडोज ऑपरेट करते. त्यांनी जगभरात भूख, गरीबी आणि कुपोषणापासून लोकांना मुक्ती मिळावी यावर काम करण्यासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनची सुरुवात केली. गेट्स हे सेवार्थी व्यक्ति असून Microsoft कंपनीच्या प्रमुख पदावरुन सेवानिवृत्त झाल्यानतंर त्यांनी आपला वेळ जगभरातील अनेक सामाजिक समस्यांचे मूळ शोधण्यात आणि ते कमी करण्यासाठी देण्याचं ठरवलंय.
गेट्स यांच्या 'माय मेसेज इन इंडिया: टू फाइट क्लाइमेट चेंज, इम्प्रूव ग्लोबल हेल्थ' या पुस्तकातून त्यांनी भारत देशाकडून भविष्यात मोठी आशा असल्याचं म्हटलंय. भारताने पोलियोचा नायनाट केला, एचआयव्ही संक्रमणही कमी केलं आहे, त्यासोबतच गरीबी आणि बालमृत्यूदरातही मोठी कमी केली आहे. देशातील स्वच्छता आणि आर्थिक सेवांमध्ये पोहोचण्यात वाढही झाल्याचं गेट्स यांनी म्हटलंय.