दिवाळी जवळ येताच कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू आणि बोनसचे वाटप करतात. बहुतेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू म्हणून गिफ्ट व्हाउचर, मिठाई किंवा क्रॉकरी देतात याची कल्पना सर्वांनाच असेल. काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून मिठाईचे बॉक्स देतात. अशा कंपन्याही आहेत ज्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी खास बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त खास भेटवस्तू देऊन कर्मचाऱ्यांच्या कामाचं चीज करतात. अलीकडेच हरियाणातील एका फार्मा कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून टाटा पंच कार भेट दिली. तामिळनाडूतील एका चहाच्या बागेच्या मालकानं आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून रॉयल एनफिल्ड बाईक दिल्या आहेत.
तमिळनाडूतील कोटागिरी येथील एका चहाच्या बागेच्या मालकानं आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस म्हणून रॉयल एनफिल्ड बाईक भेट दिली आहे. १९० एकर मध्ये असलेल्या चहाच्या बागेचे मालक पी शिवकुमार यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी उजळून टाकली. त्यांनी यावर्षी दिवाळी भेट म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांना रॉयल एनफिल्ड बाईक दिल्या आहेत. यासाठी कंपनीच्या १५ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली. उर्वरित कर्मचाऱ्यांनाही विशेष भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं.