अझरबैजान येथे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या १८ वर्षीय प्रज्ञानंद याला हरवून मॅग्नस कार्लसन जगज्जेता ठरला. मात्र, प्रज्ञानंदने उपविजेता पदाचा खिताब जिंकत जागतिक क्रमवारीत दुसर्या क्रमांकाचा बुद्धीबळपटू म्हणून देशाचा गौरव केला आहे. विशेष म्हणजे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेला तो वयाने सर्वात लहान खेळाडू ठरला आहे. त्याच्या या जगजेत्तेपदाच्या स्वप्नाचं कौतुक करत उद्योगपती आनंद महिंद्रांनी मोठी घोषणा केली आहे.
जागतिक बुद्धीबळ स्पर्धेमध्ये प्रज्ञानंदने अनुभवाची मोठी शिदोरी असलेल्या बुद्धीबळपटूंना आपले कौशल्य सिद्द करत घरचा रस्ता दाखवला. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रज्ञानंदच्या या यशाचं देभरातून कौतुक झालं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रज्ञानंदचे कौतुक केले आणि भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आता, प्रज्ञानंदने अंतिम लढतीत हार पत्करली असली तर कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा यांचेही मन जिकंलं आहे. म्हणून, त्यांनी प्रज्ञानंदला खास गिफ्ट देऊ केलं आहे.
आनंद महिंद्र यांनी प्रज्ञानंदच्या आई-वडिलांसाठी गिफ्ट देऊ केलं आहे. XUV400 इलेक्ट्रिक एसयूवी कार भेट म्हणून देण्याची घोषणाच महिंद्रांनी केलीय. तसेच, प्रज्ञानंदच्या बुद्धीचं आणि खेळाचं कौतुकही केलं. अनेकांनी मला प्रज्ञानंदला थार कार गिफ्ट करण्याची विनंती, मागणी केली. मात्र, माझ्याकडे त्यासाठी वेगळीच आयडिया आहे. आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आई-वडिलांनी प्रयत्न करायला हवेत. म्हणून, मी प्रज्ञानंद ऐवजी त्याच्या आई-वडिलांना XUV 400 ही कार गिफ्ट देऊ इच्छितो. आपल्या मुलास बुद्धीबळ खेळासाठी प्रोत्साहन आणि बळ देण्याचं काम त्यांनी केलंय. आपण, सर्वजण त्यांचे आभार मानले पाहिजे, असेही महिंद्रा यांनी म्हटलं. दरम्यान, XUV400 कारची किंमत १५.९९ लाखांपासून ते १८.९९ लाख रुपयांपर्यंत आहे.
वडिल बँकेत करतात नोकरी
प्रज्ञानंदचा जन्म १० ऑगस्ट २००५ रोजी चेन्नई येथील पाडी येथे झाला. त्याचे पूर्ण नाव रमेशबाबू प्रज्ञानंद असून ‘प्रज्ञा’ हे त्याचे टोपणनाव नाव आहे. त्याचे वडिल बँकेत नोकरी करतात, तर आई नागलक्ष्मी गृहिणी आहेत. प्रज्ञानंदला एक मोठी बहीण असून ती देखील बुद्धीबळपटू आहे. प्रज्ञानंद भारतीय बुद्धीबळ चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांना आदर्श मानतो.
प्रज्ञानंदसाठी PM मोदींचं खास ट्विट
मोदींनी ट्विट केले होते की,'' युवा प्रतिभावान आर प्रज्ञानंदच्या यशाने आम्हा सर्वांना आनंद झाला. त्याने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन याच्याविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा सार्थ अभिमान आहे. प्रज्ञानंदला पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो.'', असे मोदींनी म्हटले होते.