Join us  

गो-फर्स्टचे फोरेन्सिक ऑडिट होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 9:30 AM

गेल्या दि. ३ मे रोजी कंपनीने आपल्या ताफ्यातील ५२ पैकी २६ विमानांच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत तसेच कंपनीची आर्थिक स्थिती खालावल्याचे कारण सांगत राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाकडे दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला.

मुंबई : आर्थिक गर्तेत अडकलेल्या गो-फर्स्ट कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज केल्यानंतर आता कंपनीला कर्ज देणाऱ्या बँकांनी कंपनीच्या आर्थिक लेखा ताळेबंदाचे फोरेन्सिक ऑडिट करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे, असे झाल्यास येत्या काही दिवसांत पुन्हा उड्डाणासाठी सज्ज होण्याच्या कंपनीच्या हालचालींना खीळ बसण्याची शक्यता आहे. 

गेल्या दि. ३ मे रोजी कंपनीने आपल्या ताफ्यातील ५२ पैकी २६ विमानांच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत तसेच कंपनीची आर्थिक स्थिती खालावल्याचे कारण सांगत राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाकडे दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला. मात्र, कंपनीने बँकांना याची कल्पना न देता थेट दिवाळखोरीसाठी अर्ज केल्याने कंपनीला कर्ज देणाऱ्या बँकांना आश्चर्य वाटल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तोवर कंपनी कर्ज दिलेल्या सर्व बँकांचे कर्जाचे हप्ते नियमित फेडत होती. कंपनीने अचानक दिवाळखोरीचा अर्ज केल्यानंतर बँकांनी कंपनीकडे विचारणादेखील केली होती. मात्र, कंपनीने या बँकांना समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे समजते. त्यामुळे आता फोरेन्सिक ऑडिट करण्याच्या पर्यायाचा बँका विचार करत आहेत. 

फोरेन्सिक ऑडिट म्हणजे काय?     फोरेन्सिक ऑडिटची कार्यपद्धती ही कंपनीच्या नियमित लेखापरीक्षणाच्या पद्धतीशी साधर्म्य साधणारी अशीच आहे.     मात्र, हे लेखा परीक्षण करताना कायदेशीरदृष्ट्या कशा पद्धतीने पुरावा गोळा करता येईल, हा विचार केंद्रस्थानी असतो. त्यामुळे याप्रक्रियेत केवळ चार्टर्ड अकाउंटंट नसतात तर आर्थिक व्यवहारांचे ज्ञान असलेले कायदेतज्ज्ञदेखील असतात.     एखाद्या व्यवहारामागे संबंधित व्यवहारकर्त्याचा हेतू हा गुन्हेगारी स्वरूपाचा होता, हे सिद्ध करण्यासाठी ही पद्धती प्रामुख्याने वापरली जाते. या ऑडिटचा अहवाल हा कायदेशीर पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो.

टॅग्स :विमान