Join us

बिल गेट्स यांनी चालवली मित्राची ई-रिक्षा; व्हिडिओला गाणंही किशोर कुमाराचं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 11:48 AM

याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलाय. 

महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्र आणि मायक्रोसॉप्टचे संस्थापक बिल गेट्स हे वर्गमित्र आहेत. हॉवर्ड युनिव्हर्सिटीत दोघेही एकत्र शिक्षण घेत होते. त्यामुळेच, काही दिवसांपूर्वी आनंद महिंद्रा यांची बिल गेट्स यांनी भेट घेतली. या भेटीत दोन्ही उद्योगपतींनी मनसोक्त गप्पा मारल्या आणि पुढील काळात एकत्र येत काय करायचं, यासंदर्भातील योजनाही आखल्या आहेत. बिल गेट्स भारत दौऱ्यावर आले असून २८ फेब्रुवारी रोजी त्यांनी आनंद महिंद्रा यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीवेळी त्यांनी महिंद्र कंपनीची इलेक्ट्रीक रिक्षा चालवण्याचा आनंदही लुटला. याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलाय. 

बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर, आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भारत दौऱ्यातील काही महत्त्वाच्या आणि आवडीच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यामध्ये, महिंद्रा कंपनीच्या प्रमुखांशी म्हणजे आपल्या वर्गमित्रासोबत झालेली भेट, आणि महिंद्राच्या ऑटोरिक्षाची घेतलेल्या ट्रायलचा अनुभव गेट्स यांनी शेअर केलाय. जगातील १० सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत असलेले बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर असून आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून ते समाजकार्यात मोठं काम करु इच्छित आहेत. त्याच अनुषंगाने त्यांचा भारत दौरा अन् भेटीगाठी सुरू आहेत. 

बिल गेट्स यांनी आज इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये, ते स्वत: रिक्षा चालवताना दिसत आहेत, महिंद्रा कंपनीची ही इलेक्ट्रीकल्स ऑटोरिक्षा आहे, त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांची मोठी पसंदी मिळाली असून लाखो व्ह्यूज काही तासांतच पोहोचले आहेत. विशेष म्हणजे ‘बाबू, समझो इशारे, हॉरन पुकारे... पम-पम-पम’ हे गाणं या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला जोडण्यात आलंय. 

जगभरात कार्बन उत्सर्जन शुन्य टक्क्यांवर नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच, इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येतंय. त्यातूनच, भारतातही टू व्हीलर, फोर व्हीलरसह आता इलेक्ट्रीक थ्री व्हिलर ऑटो रिक्षाही रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यात, महिंद्रा ट्रियोचाही समावेश असून खुद्द बिल गेट्स यांनी ही रिक्षा चालवलीय. एकदा चार्जल केल्यानंतर ही रिक्षा १३१ किमीचा प्रवास सहज करू शकते, त्यामध्ये ४ प्रवाशांना बसण्याची व्यवस्था आहे.  

टॅग्स :ऑटो रिक्षाबिल गेटसआनंद महिंद्रा