Join us

घर घेणार कोटी रुपयांचं! देशातील ७ प्रमुख शहरांमध्ये १,३०,१७० घरांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 10:53 AM

विकल्या गेलेल्या १,३०,१७० घरांमध्ये एनसीआर, एमएमआर, बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद या शहरांचा वाटा ९१ टक्के इतका होता.

मुंबई : चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देभरातील निवासी घरांची जोरदार विक्री झाल्याचे दिसून आले आहे. देशातील सात प्रमुख शहरांमध्ये २०२४ च्या पहिल्या तिमाहीत १,३०,१७० घरे विकली गेली. २०२३ च्या पहिल्या तिमाहीत १,१३,७७५ घरे विकली गेली होती. देशातील सकारात्मक आर्थिक स्थिती, जीडीपीचा वाढलेला दर आणि नियंत्रणात असलेली महागाई हे घटक घरखरेदीला चालना देणारे ठरले आहेत. विकल्या गेलेल्या १,३०,१७० घरांमध्ये एनसीआर, एमएमआर, बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद या शहरांचा वाटा ९१ टक्के इतका होता.

ॲनारॉक ग्रुपचे अनुज पुरी म्हणाले की, या प्रमुख शहरांमध्ये मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) व पुणे या दोन शहरांचा वाटा ५१ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. एमएमआरमध्ये घरांची विक्री २४ टक्क्यांनी, तर पुण्यातील विक्री १५ टक्क्यांनी वाढली आहे. सर्व सात शहरांमध्ये या वर्षी एक लाखाहून अधिक नव्या घरांना सुरुवात करण्यात आली. 

न विकलेल्या घरांचे प्रमाण घटले या सात शहरांमधील घरांच्या उपलब्धतेत मात्र ७ टक्क्यांनी घट झाली आहे. २०२३ च्या पहिल्या तिमाहीत या शहरांमध्ये ६,२६,७५० घरे शिल्लक होती; तर २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ५,८०,८९० घरे विक्रीविना पडून आहेत.एनसीआरमध्ये चालू वर्षाच्या  पहिल्या तिमाहीत न विकल्या गेलेल्या घरांच्या संख्येत २७ टक्के इतकी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. या काळात न विकल्या गेलेल्या घरांचे प्रमाण एमएमआर आणि पुणे या प्रमुख शहरांच्या तुलनेत कमी आहे.

एमएमआर आणि आणि हैदराबादने सर्वाधिक नवीन घरांचा पुरवठा दिसून आला. एकूण नव्या घरांपैकी हे प्रमाण ५१ टक्के इतके आहे. जोरदार मागणी असल्याने १.५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या घरांची गेल्या दशकभरातील सर्वाधिक विक्रीची नोंद झाली आहे.

घरांची विक्री कुठे किती?शहर    २०२४    २०२३    वाढ/घटएनसीआर    १५,६५०    १७,१६०    -९%एमएमआर    ४२,९२०    ३४,६९०    २४%बंगळुरू    १७,७९०    १५,६६०    १४%पुणे    २२,९९०    १९,९२०     १५%हैदराबाद    १९,६६०    १४,२८०    ३८%चेन्नई    ५,५१०    ५,८८०    -६%कोलकाता    ५,६५०    ६,१८५    -९%एकूण    १,३०,१७०    १,१३,७७५    १४%

टॅग्स :व्यवसाय