पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर, त्यांच्या होणाऱ्या परावलंबी पुरवठ्यामुळे आता केंद्रातील मोदी सरकारकडून ईव्ही गाड्यांवर भर देण्यात येत आहे. ईव्ही कार किंवा दुचाकींसाठी मोदी सरकारकडून सबसिडीही देण्यात आली होती. प्रदुषणाला आळा घालण्यासाठी व इंधनाचा वापर कमी करण्यासाठी ईव्ही व्हेईकल हा उत्तम पर्याय मानला जातो. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी ग्रीन हायड्रोजन वाहनाचाही पर्याय सूचवला असून तशा काही बसेस सुरूही झाल्या आहेत. त्यातच, आता राज्यातील एका शेतकऱ्याच्या पुत्राने घरीच हायड्रोजन कार बनवली आहे. ही कार दिसायला तर भन्नाट आहेच, पण तिचा मायलेजही कौतुकास्पद आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील हर्षल नकशाने या युवकाने चक्का हायड्रोजन कार बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. एआय पॉवर्ड हायड्रोजन कार बनवून त्याने त्याची चाचणीही केली. या कारच्या प्रोटोटाइपची टेस्टींगही करण्यात आली. सोनिक वन नावाच्या या हायड्रोजन कारचे दरवाजे लंबोर्गिनी कारसारखे दिसून येतात. त्यासोबतच, कारचा फ्रंट आणि रिअर लूकही एकदम भारी आहे. विशेष म्हणजे या कारमध्ये १५० रुपयांचे हायड्रोजन टाकल्यास ३०० किमीपर्यंत तुम्ही प्रवास करू शकता. म्हणजे प्रति ५० पैसे किमी असा दमदार मायलेज ही कार देत आहे. म्हणूनच, ही कार भविष्यात लाँच झाल्यास ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
कार बनवण्यापूर्वी हर्षलने स्वतःचं वर्कशॉप बनवलं आणि या वर्कशॉपमध्येच ही कार तयार झाली. हर्षलने त्याच्या कारला 'सोनिक वन' असं नाव दिलं आहे. ही पूर्णपणे भारतात तयार करण्यात आलेली इलेक्ट्रिक कार असून ती हायड्रोजनवर चालते. कारमध्ये सेल्फ ड्रायव्हींगचे फिचर्स देण्यात आले आहेत. या कारच्या उत्पादनासाठी ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वच बाबींची पूर्तता केल्यानंतर, कारची चाचणी केल्यानंतर मंजुरी मिळाल्यास ही कार रस्त्यावर धावणार आहे. तसे झाल्यास भविष्यात हायड्रोजन कारची चलती मार्केटमध्ये पाहायला मिळेल. विशेष म्हणजे हर्षल नकशाने या युवकाने केलेल्या या प्रयोगशील उपकरणासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याचं कौतुक केलं आहे. हर्षलला ही कार बनविण्यासाठी २५ लाख रुपये खर्च आला आहे.
दरम्यान, हायड्रोजन कारच्या अशा प्रोटोटाइप मॉडेल्सना सध्या रस्त्यावर चालवण्यास मंजुरी देण्यात आलेली नाही. मात्र, भविष्यात हायड्रोजन कारला चांगली पसंती मिळू शकतो, ग्राहकांचा कलही याकडे वाढू शकतो.