देशातील प्रमुख उद्योग समुहांपैकी एक असलेल्या सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचं मंगळवारी निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. सहारा परिवाराचे प्रमुख असलेले सुब्रतो रॉय हे बऱ्याच दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होते. मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचा व्यवसाय रियल इस्टेट, मीडिया, हॉस्पिटॅलिटी, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि एअरलाईन्स असा पसरला होता. त्यांच्याकडे आयपीएलमध्ये एक टीमही होती. फॉर्म्युला वन टीम फोर्स इंडियामध्येही या समूहाची गुंतवणूक होती. अनेक वर्ष सहारा समूह भारतीय क्रिकेट टीमचा स्पॉन्सर होता. परंतु असं काय झालं आणि त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली हे जाणून घेऊ.सहारामध्ये सुरू असलेल्या कथित अनियमिततेचं संपूर्ण सत्य एका पत्रानं उघड केल्याचं सांगितलं जातें. शेवटी त्या पत्रात काय होते आणि ते पत्र कोणी लिहिलं होतं? ४ जानेवारी २०१० रोजी रोशन लाल नावाच्या व्यक्तीनं नॅशनल हाऊसिंग बँकेला हिंदीत लिहिलेली नोट पाठवली होती. रोशन लाल यांनी दावा केला की तो इंदूरमध्ये राहतो आणि व्यवसायानं सीए आहे. या पत्रात त्यांनी एनएचबीला सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या लखनौच्या सहारा ग्रुपच्या दोन कंपन्यांनी जारी केलेल्या बॉन्ड्सची चौकशी करण्याची विनंती केली होती. मोठ्या संख्येनं लोकांनी सहारा समूहाच्या कंपन्यांचे बॉन्ड्स खरेदी केले आहेत, परंतु ते नियमानुसार जारी करण्यात आले नसल्याचं त्याच म्हटलं होतं.सेबीकडे गेलं पत्रनॅशनल हाऊसिंग बँकेला अशा आरोपांची चौकशी करण्याचे अधिकार नव्हते, त्यामुळे त्यांनी हे पत्र बाजार नियामक सेबीकडे पाठवलं. एका महिन्यानंतर, सेबीला प्रोफेशनल ग्रुप फॉर इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन, अहमदाबाद स्थित अॅडव्होकेसी ग्रुपकडून अशीच एक नोट प्राप्त झाली. २४ नोव्हेंबर २०१० रोजी, सेबीनं सहारा समूहाला जनतेकडून कोणत्याही स्वरुपात पैसे गोळा करण्यावर बंदी घातली. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आणि न्यायालयानं सहारा समूहाला १५ टक्के वार्षिक व्याजासह गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले. ही रक्कम २४,०२९ कोटी रुपये होती.२०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निर्णयात सहारा समूहाच्या कंपन्यांनी सेबी कायद्याचं उल्लंघन केल्याचं म्हटलं होतं. बँकिंग सुविधांचा लाभ न घेऊ शकणाऱ्या लाखो भारतीयांकडून हा पैसा उभारण्यात आल्याचं कंपन्यांनी सांगितलं. सहारा समूहाच्या कंपन्या गुंतवणूकदारांना पैसे देण्यात अपयशी ठरल्यावर न्यायालयाने रॉय यांची तुरुंगात रवानगी केली. त्यांनी दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात काढला. ६ मे २०१७ पासून ते पॅरोलवर होते. आईच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी त्यांना पहिल्यांदा पॅरोल मिळाला होता, तो नंतर वाढवण्यात आला.कोण होते रोशन लाल?सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेडनं २३२.८५ लाख गुंतवणूकदारांकडून १९,४००.८७ कोटी रुपये आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडनं ७५.१४ लाख गुंतवणूकदारांकडून ६३८०.५० कोटी रुपये गोळा केल्याचं सरकारनं संसदेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं होतं. आपल्याला गुंतवणूकदारांचे पैसे परत करायचे आहेत पण ही रक्कम सेबीकडे अडकली असल्याचं सहाराचं म्हणणं आहे. दुसरीकडे, सेबी म्हणते की ते सहारा गुंतवणूकदारांना व्याजासह केवळ १३८.०७ कोटी रुपये परत करू शकले. त्यांना केवळ तितकेच दावे मिळाले मिळाल्याचं सांगण्यात आलं.
सहारा समूहानं रोशन लाल यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते सापडले नाही. सहारा प्राइम सिटी इश्यूचे मर्चंट बँकर एनम सिक्युरिटीजनं इंदूरच्या जनता कॉलनी येथील रोशन लाल यांच्या पत्त्यावर पत्र पाठवलं होतं, परंतु ते परत करण्यात आलं. पत्ता सापडला नाही असं त्यावर लिहिण्यात आलं होतं, असं सहारा समूहाच्या वकिलांनी रेकॉर्डवर सांगितलं होतं. एवढंच नाही तर या प्रकरणात इच्छुक असलेल्या अनेकांनी रोशन लाल यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते सापडलेच नाही. रोशन लाल नावाची कोणतीही व्यक्ती नाही. हे काम कॉर्पोरेट प्रतिस्पर्ध्यांद्वारे केलेलं असू शकतं असं काही जाणकारांचं म्हणणं आहे.