नवी दिल्ली : ‘स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामीन राहू नको’, असा शाहीर अनंत फंदी यांचा एक फटका आहे. अलीकडील काळात कर्जासाठी जामीन (गॅरेंटर) राहणाऱ्या लोकांसाठी हा फटका अचूक प्रबोधन करणारा ठरू शकतो. कारण कर्जदाराने कर्ज न फेडल्यास जामीनदार अडचणीत येऊ शकतो.
साधारणत: कर्जाला जामीनदार म्हणून मित्रच निवडले जातात. त्यामुळे अनेक मित्रांना आर्थिक भुर्दंड बसतो. आपल्या मित्राच्या कर्जास तुम्ही जामीनदार राहणार असाल तर यासंबंधीच्या ५ बाबी तुम्ही सर्वप्रथम जाणून घेणे आवश्यक आहे.
अटी पाहा : जामीनदार म्हणून स्वाक्षरी करण्यापूर्वी कर्ज करारावरील सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. एखादी अट जाचक वाटत असेल, तर स्वाक्षरी करू नका.
कर्जदार कसा? : कर्ज घेणाऱ्याची आर्थिक स्थिती, कर्ज फेडण्याची ऐपत, त्याचा क्रेडिट स्कोअर या बाबी योग्य असतील तरच स्वाक्षरी करा.
..तर फटका : तुम्ही जामीनदार असलेले कर्ज थकल्यास तुमचा क्रेडिट स्कोअरही घसरतो. त्यामुळे कर्ज फेडू शकेल, अशाच व्यक्तीला जामीन राहा.
अतिरिक्त कर्ज : कर्जदाराने तुमच्या हमीवरील कर्जावर आणखी अतिरिक्त कर्ज घेतले तर स्वत:ला त्यापासून वेगळे करून घ्या.