Join us  

Byju's च्या फाऊंडरनाच हटवण्यासाठी गुंतवणूकदारांच्या समूहानं बोलावली बैठक, काय लावले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 1:11 PM

ज्या भागधारकांनी एकत्रितपणे ईजीएम बोलावली आहे त्यांची बायजूसमध्ये ३० टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे.

एज्युटेक कंपनी बायजूच्या आर्थिक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, कंपनीच्या प्रमुख गुंतवणूकदारांच्या एका गटानं तिच्या संस्थापक सीईओंना हटवण्यासाठी शुक्रवारी एक एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गुंतवणूकदारांनी बायजू रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबीयांवर 'गैरव्यवस्थापन आणि अपयश' असा आरोप करत त्यांना हटवण्याची मागणी केली आहे. ज्या भागधारकांनी एकत्रितपणे ईजीएम बोलावली आहे त्यांची बायजूसमध्ये ३० टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. रवींद्रन आणि कुटुंबीयांचा कंपनीत जवळपास २६ टक्के हिस्सा आहे.

या प्रकरणातील जाणकार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईजीएमसाठी दिलेल्या नोटीसमध्ये थिंक अँड लर्नच्या विद्यमान मंडळाची हकालपट्टी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. थिंक अँड लर्न बायजूसच्या ब्रँड नावाखाली काम करते. बोर्डात रवींद्रन, त्यांची पत्नी आणि सहसंस्थापक दिव्या गोकुलनाथ आणि त्यांचा भाऊ रिजू रवींद्रन यांचा समावेश आहे. आर्थिक गैरव्यवस्थापन, कंपनीच्या कायदेशीर अधिकारांची अंमलबजावणी करण्यात व्यवस्थापनाचं अपयश आणि महत्त्वपूर्ण माहिती लपवून ठेवल्याचा आरोप करत त्यांना हटवण्याची मागणी नोटीसमध्ये करण्यात आलीये. 

राईट्स इश्यूमध्ये ३० कोटींचं कमिटमेंट 

एड्युटेक प्रमुख थिंक अँड लर्नला राईट इश्यूद्वारे गुंतवणूकदारांकडून ३० कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे २५०० कोटी रुपयांचं कमिटमेंट मिळालं आहे. बायजू ब्रँड अंतर्गत असलेल्या थिंक अँड लर्ननं २२-२५ कोटी डॉलर्सच्या एंटरप्राईज मूल्यांकनावर २० कोटी डॉलर्स उभारण्यासाठी राईट्स इश्यू जारी केला होता, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

टॅग्स :व्यवसाय