Francoise Bettencourt Meyers Networth: मुकेश अंबानी आणि गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. जगातील टॉप अब्जाधीशांच्या यादीतही त्यांचे नाव आहे. पण, आता फ्रान्सच्या एका महिलेने या दोघांना मागे टाकलंय. फ्रँकोइस बेटेनकोट मेस (Francoise Bettencourt Meyers), असे या महिलेचे नाव असून, ही जगातील सर्वात श्रीमंत महिला आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत ती 12 व्या स्थानावर पोहोचली आहे.
विशेष म्हणजे, 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती कमवणारी ती जगातील पहिली महिला ठरली आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी 97 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 13व्या क्रमांकावर आहेत. म्हणजेच, या महिलेकडे मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त संपत्ती आहे. दरम्यान, फ्रँकोइस मेस, ही सर्वात मोठी कॉस्मेटिक कंपनी L'Oreal ची होल्डिंग कंपनी Tethys ची चेअरपर्सन आणि L'Oréal Group च्या संचालक मंडळाची उपाध्यक्ष आहे.
कंपनीची जबरदस्त कामगिरी
सध्या L'Oreal चे शेअर्स 34 टक्क्यांच्या वाढीसह विक्रमी पातळीवर व्यवहार करत आहेत. L'Oreal च्या विक्रीत 42 अब्ज डॉलर्सची झेप झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, सध्या मेस यांची संपत्ती $100.1 बिलियन झाली आहे. त्याच्या संपत्तीत ही वाढ त्याच्या आजोबांनी स्थापन केलेल्या L'Oreal SA मधील ब्युटी प्रोडक्ट्सच्या शेअर्सच्या रुपाने झाली आहे.
फ्रँकोइस बेटेनकोट मेस कोण आहे?
मेस आणि त्यांच्या कुटुंबाची L'Oreal कंपनीमध्ये 34 टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. सर्वात श्रीमंत महिलेचा विक्रम करण्यासोबतच त्या एक फिलांथ्रॉपिस्ट लेखिका देखील आहेत. त्यांना ही संपत्ती वारसा हक्काने मिळाली आहे. दरम्यान, मेस 1997 पासून L'Oreal बोर्डात आहे. आईच्या निधनानंतर या कंपनीच्या प्रमुख झाल्या. जगातील सर्वात श्रीमंत महिला होण्याचा विक्रमही त्यांच्या आईच्या नावावर होता. मेस अनेक वेळा अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या 10 मध्ये आल्या आहेत. पण, त्यांची संपत्ती 100 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
फ्रान्समध्ये दुसऱ्या स्थानावर
फ्रान्समधील श्रीमंतांच्या यादीबद्दल बोललो, तर त्यांचा दुसरा क्रमांक लागतो. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नॉल्ट फ्रान्समधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, त्यांची एकूण संपत्ती या वर्षात $16.9 अब्जने वाढून $179 अब्ज झाली आहे. तर, मेस यांच्या संपत्तीत यावर्षी 28.6 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.