Join us

चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 4:26 PM

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डची किंमत 1.8 टक्क्यांनी घसरून 2,333.69 डॉलर प्रति औंसवर आली आहे...

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. परिणामी या दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव आकाशाला भिडले आहेत. विकसनशील देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची विक्रमी खरेदी करण्यात आल्याने, ही भाववाढ झाल्याचे बोलले जात आहे. मात्र शुक्रवारी (7 जून) सोन्याच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही बाजारांत जवळपास 2 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेने सोन्याची खरेदी थांबवल्याने ही घसरण झाल्याचे मानले जात आहे.

चिनी सेंट्रल बँक गेल्या १८ महिन्यांपासून सातत्याने सोन्याची खरेदी करत होती. मात्र मे महिन्यात त्यांनी सोन्याची खरेदी थांबवली आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डची किंमत 1.8 टक्क्यांनी घसरून 2,333.69 डॉलर प्रति औंसवर आली आहे. एवढेच नाही, तर सोन्याने या आठवड्यात आलेली तेजी बाजार बंद होता होता जवळपास गमावली. सोने या आठवड्यात आतापर्यंत केवळ 0.3% ने वर आहे. 

महत्वाचे म्हणजे, ऑक्टोबर २०२२ नंतर चीनच्या पीपल्‍स बँक ऑफ चायनाने (PBOC) आपल्या गोल्‍ड र‍िझर्व्हमध्ये कुठल्याही प्रकारची वृद्धी न करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनकडे मे अखेरीस 7.28 कोटी ट्रॉय औंस एवढे सोने होते.

देशांतर्गत बाजारातही सोनं घसरलं -भारताचा विचा करता, https://ibjarates.com वरील आकडेवारीनुसार, 21 मे रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याचा भाव 74222 रुपयांच्या ऑल टाइम उच्चांकावर पोहोचला होता. याच प्रमाणे 29 मे रोजी चांदीचा भावही 94280 रुपये प्रति किलो एवढा होता. शुक्रवारी बंद झालेल्या व्यवहाराच्या आठवड्यात सोन्याचा भाव 71913 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 90535 रुपये प्रति किलोवर आली आहे. चीनमधून आलेल्या वृत्ताचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे, या वृत्ताचा प्रभाव बाजारात कायम राहील आणि सोमवारी सोन्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :सोनंचांदीचीनबाजारगुंतवणूक