पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नायजेरियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केले. नायजेरियन राजकारणात ७२ वर्षीय टिनुबू यांचं मोठं स्थान आहे. १९९१ सालापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
राजकारणासोबतच टीनूबू हे व्यवसाय विश्वातही मोठं नाव आहे. त्यांच्याकडे महालापासून ते खासगी विमानांचा ताफा आणि ३० हून अधिक लक्झरी गाड्या आहेत. इतकंच नाही तर ब्रिटन आणि अमेरिकेसह परदेशातही टिनुबू यांची बरीच संपत्ती आहे. अशा तऱ्हेने टिनूबू जगातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक आहेत.
१०० कोटींपेक्षा अधिक किंमतीचं जेट
टिनुबूकडे खाजगी विमान आहे. मीडिया रिपोर्टनुसार, याची किंमत २१.७ अब्ज नायजेरियन नायरा (सुमारे १११ कोटी रुपये) आहे. टिनुबू आपल्या खाजगी जेटचा वापर देशभरातील दूरचा प्रवास आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी करतात.
३० हून अधिक लक्झरी कार
टिनुबू यांना लक्झरी कार्सचीही आवड आहे. त्यांच्याकडे ३० हून अधिक लक्झरी गाड्यांचा ताफा आहे. या कारमध्ये जीप प्राडो आणि लँड रोव्हर सारख्या जगातील सर्वात महागड्या गाड्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याच्या कार कलेक्शनमध्ये शेवरले, बीएमडब्ल्यू, फोर्ड, लेक्सस, मर्सिडीज बेंझ आणि पोर्श यांचाही समावेश आहे.
परदेशातही संपत्ती
टिनुबू यांची नायजेरियातच नव्हे तर परदेशातही मोठी मालमत्ता आहे. यामध्ये अनेक महाल आणि शॉपिंग सेंटरचा समावेश आहे. यामध्ये नायजेरियाची राजधानी अबुजा आणि ब्रिटन तसंच अमेरिकेतील मोठ्या महालांचा समावेश आहे.
अबुजा येथे असलेल्या महालाची किंमत ६५० दशलक्ष नायजेरियन नायरा (सुमारे ३.३ कोटी रुपये) आहे. ते या महालात राहतात. याशिवाय नायजेरियात त्यांच्या आणखी ही अनेक मालमत्ता आहेत, ज्यांची एकूण किंमत कोट्यवधी रुपये आहे.
नेटवर्थ किती?
टीनुबू हे अफाट संपत्तीचा मालक आहेत. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, टिनुबू यांची नेटवर्थ सुमारे ११५ अब्ज नायजेरियन नायरा (सुमारे ५८६ कोटी रुपये) आहे. त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणजे अध्यक्ष म्हणून पगार आणि व्यवसायातून मिळणारं उत्पन्न.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अध्यक्ष म्हणून त्यांचं वार्षिक वेतन ५० कोटी नायजेरियन नायरा (सुमारे २५ लाख रुपये) आहे. त्याचबरोबर व्यवसाय, गुंतवणूक, भाडं आदींमधूनही ते कमाई करतात. टीनुबू यांनी आपली सर्व मालमत्ता भाड्यानं दिली आहे. यातून ते दरवर्षी सुमारे ३३० कोटी नायजेरियन नायरा (सुमारे १२ कोटी रुपये) कमावतात.
टिनुबू यांच्या मालमत्तेवरूनही वाद झाले आहेत. राजकारणाचा गैरफायदा घेऊन मोठ्या पदावर असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याचं कारण म्हणजे त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली आहे.