नवी दिल्ली - दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणावेळी देशभरात ३.७५ लाख कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली आहे. कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा आकडा ४.२५ लाख कोटींचा पल्ला पार करेल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Vocal For Local चं आवाहन जनतेला केले होते. त्यामुळे चीनला तब्बल एक लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया कॉमर्स ट्रेडर्स अर्थात कॅटच्या इंडियन प्रॉडक्ट्स-सबका उस्ताद मोहिमेला देशभरातील ग्राहकांचा प्रचंड पाठिंबा मिळाला. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, यंदाच्या दिवाळी हंगामात देशभरातील बाजारपेठांमध्ये ३.७५ लाख कोटी रुपयांहून अधिकचा विक्रमी व्यवसाय झाला. सर्व सणांच्या दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर भारतीय वस्तूंची खरेदी केली. गोवर्धन पूजा, भैय्या दूज, छठ पूजा, तुलसी विवाह आणि कार्तिक पौर्णिमेला सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा अधिक व्यवसाय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच हा आकडा ४.२५ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
चीनला एक लाख कोटींहून अधिक नुकसान
खंडेलवाल यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी चीनला दिवाळीच्या सणावर १ लाख कोटी रुपयांहून अधिकच्या व्यवसायात मोठा तोटा झाला. पूर्वीच्या काळात दिवाळीच्या सणांमध्ये चीनमध्ये बनवलेल्या वस्तूंना भारतीय बाजारपेठेत ७० टक्के हिस्सा मिळायचा. यावेळी ते खूपच कमी होते. देशातील व्यापाऱ्यांनी यंदा चीनमधून दिवाळीशी संबंधित कोणतीही वस्तू आयात केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्थानिक आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेचा हा परिणाम आहे.
एका अंदाजानुसार, ३.५० लाख कोटी रुपयांच्या सणासुदीच्या व्यापारात सुमारे १३% अन्न आणि किराणा, ९% दागिने, १२% कपडे आणि वस्त्रे, ४% सुका मेवा, मिठाई आणि नमकीन, ३% गृह फर्निशिंग, ६% सौंदर्यप्रसाधने, ८% इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल, ३% पूजासमाग्री आणि पूजा साहित्य, ३% भांडी आणि स्वयंपाकघर उपकरणे, २% मिठाई आणि बेकरी, ८% भेटवस्तू, ४% फर्निशिंग आणि फर्निचर आणि उर्वरित २०% ऑटोमोबाईल, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल, खेळण्यांसह इतर अनेक वस्तू आणि सेवांवर ग्राहकांनी खर्च केले आहेत.
पॅकिंग व्यवसायालाही मोठी बाजारपेठ
देशभरातील पॅकिंग व्यवसायालाही या दिवाळीत मोठी बाजारपेठ मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या सणांमध्ये स्थानिक पातळीवर बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले होते, ज्याचा मोठा परिणाम संपूर्ण देशात दिसून आला. देशातील सर्व शहरांतील स्थानिक उत्पादक, कारागीर आणि कलाकारांनी बनवलेल्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली, त्यामुळे दिवाळी सणाच्या माध्यमातून देश आणि जगाला स्वावलंबी भारताची खास झलक दाखवण्यात आली.