Greenhitech Ventures IPO Listing : ग्रीनहायटेक व्हेंचर्स (Greenhitech Ventures) या छोट्या कंपनीनं शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री घेतलीये. ग्रीनहायटेक व्हेंचर्सचे शेअर्स 90 टक्क्यांच्या नफ्यासह 95 रुपयांना शेअर बाजारात लिस्ट झाले. IPO मध्ये गुंतवणूकदारांना 50 रुपयांना Greenhitech Ventures चे अलॉट झाले होते. कंपनीचा IPO 12 एप्रिल 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होता आणि तो 16 एप्रिलपर्यंत खुला होता. ग्रीनहायटेक व्हेंचर्सच्या आयपीओची एकूण साईज 6.30 कोटी रुपये होती.
जबरदस्त लिस्टिंगनंतर अपर सर्किट
जबरदस्त लिस्टिंगनंतर लगेचच, ग्रीनहायटेक व्हेंचर्सचे शेअर्स 5% च्या अपर सर्किटसह 99.75 रुपयांवर पोहोचले. म्हणजेच 50 रुपयांच्या इश्यू प्राईसच्या तुलनेत पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना कंपनीच्या शेअर्समध्ये 99.50 टक्के नफा झाला आहे. ग्रीनहायटेक व्हेंचर्सच्या शेअर्सनं लिस्टिंगच्या दिवशी लोकांचे पैसे दुप्पट केले. कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजाराच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट झालेत. आयपीओ पूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा 100 टक्के होता, जो आता 73.19 टक्क्यांवर आलाय. ग्रीनहायटेक व्हेंचर्स नोव्हेंबर 2011 मध्ये सुरू झाली. ग्रीनहायटेक व्हेंचर्सचं मुख्य कार्यालय जवाहर नगर कॉलनी, भेलूपुरा, वाराणसी येथे आहे.
IPO 769 पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब
ग्रीनहायटेक व्हेंचर्सचा (Greenhitech Ventures IPO) आयपीओ एकूण 769.95 पट सबस्क्राईब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 597.41 पट सबस्क्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये फक्त 1 लॉटसाठी बेट लावता येणार होती. आयपीओच्या 1 लॉटमध्ये 3000 शेअर्स आहेत. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना 1.50 लाख रुपये गुंतवावे लागणार होते. यातून उभारलेला निधी खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि सामान्य कॉर्पोरेट खर्च भागवण्यासाठी कंपनी वापरेल.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)