न्यूयाॅर्क : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टाॅप- ५ मध्ये असलेले उद्याेगपती जेफ बेझाेस यांनी त्यांच्या संपत्तीबाबत माेठा खुलासा केला आहे. बेझाेस यांनी संपत्तीतील बहुतांश हिस्सा कल्याणकारी याेजनांमध्ये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. बेझाेस यांनी आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर खर्च जपून करा, असा सल्ला लाेकांना दिला आहे.
जेफ बेझाेस हे ॲमेझाॅनचे संस्थापक आहेत. बेझाेस यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ते आपल्या संपत्तीतील बहुतांश हिस्सा दान करणार आहेत. हवामान बदलांसंबंधी समस्यांवर काम करणाऱ्यांना ते एक माेठा हिस्सा देऊ इच्छितात. याचा मानवतेला जास्त फायदा हाेईल, असे बेझाेस म्हणाले. जेफ बेझाेस यांच्यावर यापूर्वी ‘गिव्हिंग प्लेज’वर स्वाक्षरी न केल्यावरून बरीच टीका झाली हाेती. जगातील अनेक अब्जाधीशांनी दान करण्यासाठी या करारावर स्वाक्षरी केली आहे. दान करण्यासंबंधी बेझाेस यांची सहकारी व माजी पत्रकार लाॅरेन सांचेझ ही त्यांना मदत करीत आहे. (वृत्तसंस्था)
अमेरिकेवर मंदीचे सावट
बेझाेस यांनी अमेरिकेवर आर्थिक मंदीचा धाेका कायम असल्यासे म्हटले आहे. लाेकांनी माेठ्या व महागड्या वस्तूंची खरेदी सध्या टाळायला हवी. जवळचा पैसा जपून ठेवा, असा सल्ला बेझाेस यांनी दिला आहे.
‘संपत्तीचे दान साेपे नाही’
बेझाेस म्हणाले की, ॲमेझाॅनची उभारणी करणे साेपे नव्हते. त्याच प्रकारे आतापर्यंत कमाविलेली संपत्तीदेखील दान करणे साेपे नाही. संपत्ती दान करणार आहे; मात्र ते कसे करावे, हेच मला समजत नाही.
बेझाेस यांच्याकडे १२४ अब्ज डाॅलर्सची संपत्ती
जेफ बेझाेस यांची सुमारे १२४ अब्ज डाॅलर्स एवढी संपत्ती आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते चाैथ्या क्रमांकावर आहेत. ट्विटरचे नवे मालक इलाॅन मस्क यांच्यासह बर्नार्ड अर्नाल्ट आणि भारतीय उद्याेगपती गाैतम अदानी हे या यादीत बेझाेस यांच्यापेक्षा वरच्या स्थानावर आहेत.