Join us

जन्म तारखेचा पुरावा म्हणून आता Aadhaar Card वैध नाही, EPFO चा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 3:45 PM

ईपीएफओनं (EPFO) आधार कार्डबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

EPFO Update: ईपीएफओनं (EPFO) आधार कार्डबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जन्मतारीख अपडेट किंवा दुरुस्त करण्यासाठी आता आधार कार्ड वापरता येत नाही. ईपीएफओनं वैध कागदपत्रांच्या यादीतून आधार कार्ड वगळलं आहे. या संदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (Employees' Provident Fund Organization) परिपत्रकही जारी केलंय.

श्रम मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ईपीएफओनं, आधार वापरून जन्मतारीख बदलता येणार नसल्याचं म्हटलंय. ईपीएफओनं १६ जानेवारीला हे परिपत्रक जारी केलंय. त्यानुसार UIDAI कडून एक पत्रही प्राप्त झाले आहे. जन्मतारीख बदलायची असल्यास आधार कार्ड वैध राहणार नाही, असं सांगण्यात आलं आहे. ते वैध कागदपत्रांच्या यादीतून काढून टाकण्यात यावं, असं त्यात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे आधार काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कागदपत्रांची गरज

ईपीएफओच्या मते, जन्म प्रमाणपत्राच्या मदतीनं (Birth Certificate) हा बदल केला जाऊ शकतो. याशिवाय कोणत्याही सरकारी बोर्डाकडून किंवा विद्यापीठाकडून मिळालेली मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला किंवा स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेटही वापरता येईल. यामध्ये नाव व जन्मतारीख नमूद असणं आवश्यक आहे. याशिवाय सिव्हिल सर्जनद्वारे देण्यात आलेलं वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅन क्रमांक, सरकारी पेन्शन आणि मेडिक्लेम सर्टिफिकेट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट यांचा वापर करता येईल.

ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र म्हणून वापर

UIDAI ने म्हटलंय की, आधार कार्डचा वापर ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र म्हणून केला जावा. परंतु, त्याचा जन्म प्रमाणपत्र म्हणून वापर करू नये. आधार हे १२ अंकी यूनिक ओळखपत्र आहे. ते भारत सरकारनं जारी केले आहे. तुमच्या ओळखीचा आणि कायम निवासाचा पुरावा म्हणून ते देशभर वैध आहे. आधार बनवताना त्यांच्या विविध कागदपत्रांनुसार जन्मतारीख टाकण्यात आली आहे. 

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीआधार कार्ड