कॉम्प्यूटर इंजिनीअरिंग पूर्ण करण्यासाठी अमेरिकेतील प्रतिष्ठित स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश मिळविला. पण, पुढे कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे अमेरिकेला जाता आले नाही. अभ्यासक्रमही ऑनलाइन झाला. अशात शिक्षण अर्धवट सोडून स्टार्टअप सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पालक निराश झाले. स्वप्नातील विद्यापीठात आता मी जाणार नाही, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. मला कम्प्यूटर सायन्समध्ये पदवी मिळाली असती पण त्याऐवजी मित्राला (कैवल्य वोहरा) सोबत घेऊन आम्ही ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म सुरू केला.
वयाच्या १७ व्या वर्षीच व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात केली. प्रारंभी फार यश आले नाही. पण खचून न जाता संधीची वाट पाहत राहिलो. या प्रवासाची खरी सुरुवात झाली कोविड काळात. टाळेबंदीमुळे लोकांना घराबाहेर पडणे शक्य नव्हते. किराणा दुकाने बंद होती. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत अनेक अडचणी येत होत्या. ऑनलाइन वस्तू पोहोचवण्यासाठी तीन ते चार दिवस लागायचे. आमच्या एका वयोवृद्ध शेजाऱ्याची ही समस्या सोडविण्याचा निर्णय घेतला. या समस्येतून संधी शोधली. १० मिनिटांत किराणा सामान पोहोचवण्यासाठी स्टार्टअप सुरू केले.
एका सदनिकेतून सुरूवातग्राहकांनी आम्हाला सांगितले, की ही सेवा चांगली आहे, परंतु टाळेबंदीच्या काळातच ती वापरता येईल. त्यानंतर त्याचा उपयोग होणार नाही. त्यानंतर आम्ही त्वरित आणि दर्जेदार वितरण करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या एका सदनिकेतून व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ही कंपनी सुरू झाली.
आमचे भाग्य चांगले की...सुरुवातीला काही लोकांनी आमच्या धाडसी कल्पनांना गांभीर्याने घेतले नाही. आमच्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या गुंतवणूकदारांशी आम्ही बोलायचो. आमचे भाग्य चांगले की, आम्हाला काही चांगले गुंतवणूकदार मिळाले. ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. आमचा प्रारंभीचा प्रवास खूप रोमांचक होता. आम्ही तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत शुन्यावरून दहा हजार कोटी रुपयांनी (विक्रीत) वर गेलो.
- संकलन : महेश घोराळे