Join us

केंद्र सरकारकडून खाद्यतेलावरील सीमा शुल्क रद्द; नागरिकांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 10:49 AM

यंदा श्रावणात होऊन जाऊ द्या चमचमीत

सचिन सागरेलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केंद्र सरकारने खाद्यतेलावरील सीमा शुल्क दोन वर्षांसाठी रद्द केल्याने तेलाच्या दरात काहीशी स्वस्ताई आली आहे. जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने खाद्यतेलाच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ऐन महागाईच्या दिवसांत काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच श्रावणातील सणांनिमित्त चमचमीत खाण्याची संधीही मिळणार आहे.  

सूर्यफुल तेलाची आवक युक्रेन, रशिया येथून, तर सोयाबीन तेलाची आवक शिकागो, पामतेलाची आवक इंडोनेशिया व मलेशियातून होते. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळेही तेलाचे भाव वाढले होते. परंतु, सध्या इंडोनेशिया व मलेशियामध्ये पामतेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तेथील तेलाचे दर घटल्याने कमी दरात तेथे तेलाची विक्री होत आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेतही तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी देशात आणि राज्यात खाद्यतेलाच्या दरात सातत्याने घट होत आहे. शेंगदाणा आणि राईच्या तेलाचे दर मात्र स्थिर आहेत, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. महिन्याभरापूर्वी विविध प्रकारच्या खाद्यतेलाच्या दरांनी उच्चांक गाठला होता. आता दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारपेठेसह किरकोळ बाजारातील खाद्यतेलाच्या दरातही घट झाली आहे. आता श्रावणात येऊ घातलेल्या विविध सण-उत्सवांच्या काळातच तेलाचे भाव कमी झाल्याने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

कृषी, मुलभूत शुल्कही रद्द खाद्यतेलाचे दर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने दोन वर्षांसाठी खाद्यतेलावरील कस्टम ड्युटी रद्द केली आहे. तसेच खाद्यतेलावरील कृषी, मुलभूत शुल्क आणि विकास सेसही रद्द केला आहे. याचबरोबर सीमा शुल्क आणि कृषी सेससह डेव्हलपमेंट सेसही रद्द करण्यात आला आहे. याचा सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा मिळाला आहे.

श्रावणात तेलाची विक्री वाढणारखाद्यतेल महाग झाल्यामुळे खाण्यावर मर्यादा आल्या होत्या. तळलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण घटले होते. आता तेलाच्या दरात घट झाल्याने पूर्वीसारखेच तळलेले आणि चमचमीत खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी श्रावणात तेलाची विक्री वाढण्याची शक्यता आहे.

घटलेल्या तेलाच्या दरामुळे गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात ग्राहकांची दुकानामध्ये गर्दी दिसू लागली आहे.         - दीपक भानुशाली, तेलाचे व्यापारी

तेलाच्या वाढलेल्या दरामुळे पूर्वी एक किंवा पाच किलो तेल घेत होतो. आता खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने १५ किलोचा डबा घरी घेऊन गेलो आहोत.    - प्रीती प्रशांत चवाथे, गृहिणी

खाद्यतेलाच्या कमी झालेल्या दरामुळे यंदाच्या श्रावणात तळलेल्या आणि चमचमीत पदार्थांच्या प्रमाणात वाढ करण्याचा विचार करत आहोत.    - सायली संतोष शेटे, गृहिणी

 

टॅग्स :तेल शुद्धिकरण प्रकल्पकेंद्र सरकारश्रावण स्पेशल