मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्ताकारणावरून चर्चेत असलेली अॅक्सिस बँकेला मोठा झटका बसला आहे. गेल्या काही महिन्यांत या बँकेच्या 15000 कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका सुरू केल्याने अॅक्सिस बँक चर्चेत आली होती. अमृता या बँकेच्या उपाध्यक्षा आहेत.
राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जादातर मध्यम आणि शाखेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. तसेच यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. नव्या व्यवस्थापनावर नाराज असल्याचे कारण या कर्मचाऱ्यांनी दिले आहे. ग्राहकांशी थेट संपर्कामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. याचा फटका बँकेच्या कामकाजावर बसण्याची शक्यता आहे. मात्र, बँकही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती करत असल्याचा दावा करत आहे.
बँकेच्या व्यवस्थापनाकडून दिली जाणारी कार्य़पद्धती पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण त्यांना वेगळीच कामे देण्यात येत आहेत. या बदलामुळे जुन्या कर्मचाऱ्यांना बँकेमध्ये काम करणे कठीण जात आहे, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. बँकेनेही कर्मचारी सोडून जात असल्याचे मान्य केले आहे. परंतू त्याआधीच 28000 लोकांची भरतीही केल्याचे बँकेचे म्हणणे आहे. या आर्थिक वर्षात 12800 कर्मचारी भरती केले आहेत. तर उरलेल्या महिन्यांत आणखी 4000 कर्मचारी भरती केले जाणार असल्याचेही बँकेने म्हटले आहे. याशिवाय पुढील दोन वर्षांत आणखी 30000 कर्मचारी भरती करण्यात येणार आहे. अॅक्सिक बँकेचे सध्या 72 हजार कर्मचारी आहेत.