लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे येणाऱ्या महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती ७ ते १० टक्क्यांनी वाढणार असल्याचे या कंपन्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे. किमतीत वाढ होऊ शकणाऱ्या उत्पादनात एसी, फ्रिज आणि कूलर यांचा प्रामुख्याने समावेश असेल.
मागील दोन वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती तीन वेळा वाढविण्यात आल्या असून आगामी दरवाढ चौथी असेल. उत्पादन खर्च वाढल्यामुळे २०१९ च्या तुलनेत कंपन्यांनी हळूहळू दरवाढ केली आहे. आता पुन्हा ५ ते ७ टक्के दरवाढ करण्याची वेळ आहे. कारण सध्या कंपन्या आपल्या नफ्यात कपात करून विक्री करीत आहेत, असे गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि ईव्हीपी कमल नंदी यांनी सांगितले.
ही तीन कारणे
रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात झालेली तांबे आणि ॲल्युमिनियमच्या किमतीतील वाढ हे दरवाढीमागील प्रमुख कारण आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत १.६१ लाख रुपये टन असलेले ॲल्युमिनियम आता २.८० लाख रुपये टन झाले आहे. तांब्याचा भावही ५.९३ लाखांवरून ७.७२ लाखांवर गेला आहे. याशिवाय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे कंपन्यांनी उत्पादन वाढविलेच नाही. आता मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यामुळे किमती वाढू शकतात. कच्च्या तेलाचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे किमती वाढणे अटळ आहे.